अमरावती : कोरोना महामारीने सर्व जगाची झोप उडवली असताना प्रशासन मात्र नागरिकांना सावरण्याच्या कामात आहे. सर्वोत्परी मदत शासन करत असलं तरी यातही अनेक अडचणींचा सामना शासनाला करावा लागत आहे. अमरावती पालिकेसमोरही असंच एक संकट उभ ठाकलं आहे. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा 1600 असून 50 हजार रुपयांच्या सानुग्रह मदतीसाठी मात्र 3000 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. अमरावती शहरात 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, पण अर्ज मात्र 2 हजार 800 आल्याने खळबळ उडाली आहे. अर्जाची संख्या एवढी जास्त असल्याने महानगरपालिका प्रशासन सुद्धा अचंबित झाले आहे.  मृतांच्या आकडेवारीत काही हेराफेरी तर झालेली नाही ना अशीही चर्चा सुरू झाल्याने आता यावर प्रशासन कसा तोडगा काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

कोविड-19 ने दगावलेल्या व्यक्तीच्या वारसाला राज्य शासनाकडून 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी वेब पोर्टल कार्यान्वित झाले असून, अमरावती जिल्ह्यात कोरोनाने 1600 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबधित मृतांच्या वारसाला 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश न्यायालयाने 10 ऑक्टोबर रोजी दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने वारसाच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी काही निकष देण्यात आले असून, ते पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचेच वारस लाभास पात्र ठरणार आहेत. अमरावती शहर वगळता ग्रामीण भागात 1 हजाराच्या आसपास कोरोनामुळे मृत्यू झाला. पण या एक हजारांसाठी केवळ 200 अर्ज प्राप्त झाले असून अमरावती शहरात 567 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाल्यांची सरकारी नोंद असूनही सानुग्रह मदतीसाठी तब्बल 2800 अर्ज आले आहेत. यामुळे आता महानगरपालिका प्रशासनची झोप उडाली आहे. अधिकाऱ्यांचे मते यात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. पण हा इतका मोठा फरक कसा येईल याबद्दल चर्चा आता सुरू झाली आहे. मृतांच्या आकडयात काही हेराफेरी तर नाही झाली ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्वांवर आता प्रशासन काय करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

हे ही वाचा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha