MHADA Exam Latest Update : म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्य़ात आली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत आव्हाडांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर भाजपने आव्हाड आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला पकडलं. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. म्हडाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाच्या भरतीच्या परीक्षेतेचा पेपर कुठेही फुटला नाही, त्याआधीच कारवाई करण्यात आली. म्हाडाच्या पेपरसंदर्भात फक्त एकाच व्यक्तीला माहिती होती, तरीही पेपर कसा फुटला? म्हाडाच्या परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झालाय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड म्हणाले.
म्हाडाच्या परीक्षा अचानक रद्द कऱण्यात आल्यामुळे विद्यार्थांना मनस्ताप झाला. सर्व विद्यार्थांची मनापासून माफी मागतोय. विद्यार्थांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे. त्याशिवाय, पुढील परीक्षेला त्यांच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. यापुढे म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका तयार करेल, असे आव्हाडांनी सांगितलं.
परीक्षा जानेवारी महिन्यात होईल - जितेंद्र आव्हाड
आज म्हाडा साठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
म्हाडा पेपरफुटीचे बिंग फुटले
आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याचा संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यामागचे कारणही तसेच आहे .ज्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितेश देशमुख व दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली . हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला . याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केलाय . यामागे क्लास चालवणारे मोठ्या प्रमाणावर असतात असा संशय पुणे पोलिसांना होता आणि त्याच आधारे म्हाडा पेपरफुटीचे बिंग फुटले गेले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live