जालना : देशात ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण सापडल्याने सामान्य लोकांमध्ये आता पुन्हा चिंतेचं वातावरण पसरलं आहे. कदाचित पुढच्या काळात कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनची असू शकेल पण त्यामुळे घाबरण्याचं कारण नसून ओमायक्रॉन हा धोकादायक नाही असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. 


आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "ओमायक्रॉनमुळे संसर्गाची भीती वाटतेय, मात्र घाबरण्याचे कारण नाही. यावर लगेच निर्बंधाची कारवाई करणे लोकांना जाचक आणि त्रासदायक होईल. त्यामुळे लगेच निर्बंधाची आवश्यकता नाही. लोकांनी आपल्या पातळीवर काळजी घेणं गरजेचं आहे." 


कर्नाटकामध्ये आढळलेल्या दोन ओमायक्रोन रुग्णांमुळे राज्यात सतर्कतेचं आवाहन करत राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्वांनी लस घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.


ओमायक्रॉनचे देशात तीन रुग्ण
महाराष्ट्रानजीकच्या गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. आधी कर्नाटक आणि आता गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानं महाराष्ट्राच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. झिम्बाब्वेहून परतलेल्या 72 वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे आता देशात देशात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण झाले आहेत. त्यापैकी दोन कर्नाटकमध्ये आणि एक गुजरातमध्ये आहे.


ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे.  महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा अॅक्शन प्लॅन समोर आला आहे. मुंबईतील मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक येथे लसीचे दोन डोस असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. जर या ठिकाणी कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास  संबंधित संस्थांना 10 हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या :