परभणी : भाजप आणि काँग्रेस एकच आहेत, हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता असेही जानकर म्हणाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी भेट दिली.
आम्ही काय भाजपचे चेले नाही
ओबीसी आरक्षणासाठी परभणीच्या गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी तहसील कार्यालयासमोर अखंड धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जानकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबरच भाजपवर चांगलीच टीका केलीय. जेव्हा कलम 340 आणि 341 लिहिलं गेलं तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी ओबीसी आरक्षणाला तमाम भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला. ओबीसीबाबत बोललं की संपवलं जात असा आरोप यावेळी जानकरांनी केला. ओबीसी आरक्षण जाण्याला कॉंग्रेस आणि भाजप दोघेही जबाबदार आहेत. कॉंग्रेसच काय भाजपही आपल्याला ओबीसी आरक्षण देऊ शकत नाही, हे शर्यत लावून सांगतो. कारण, हे दोन्ही पक्ष एकच आहेत. या दोन्ही पक्षांनी ओबीसींचा डेटा द्यायचा नाही असं एकत्रीत ठरवले असल्याचा गंभीर आरोप जानकरांनी केलाय. आम्ही काय भाजपचे चेले किंवा काँग्रेसचे दलाल नाही. त्यामुळे ओबीसींच्या बाबतीत जेव्हाही आवाज उठवायचा असेल तेव्हा आम्ही उठवू असंही जानकर यावेळी म्हणाले.
घोड पेंड कुठे खाते
सभागृहात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते ओबीसींची जणगणना झाली पाहिजे, मग घोड पेंड कुठे खाते? असा सवाल जानकर यांनी केला. भाजप आणि काँग्रेसने ओबीसींची आकडेवारी द्यायची नाही ठरवले आहे. कारण आकडेवारी दिली तर समाजाची प्रगती होईल, त्यामुळे ते आकडेवारी देत नसल्याचे जाणकर म्हणाले. ज्यावेळेस ओबीसींची पोर सभागृहात जातील त्यावेळीच समाजाला न्याय मिळेल. मी कोणत्या पक्षावर टीका करण्यासाठी आलो नाही, मात्र, ज्या पक्षाने केले ते सांगण्यासाठी गंगाखेडमध्ये आलो असल्याचे जानकरांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: