मुंबई : रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना चालू रब्बी हंगामात राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही अंतिम मुदत आहे. पिक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. शासनाकडून सांगण्यात आले आहे की, शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरले असल्याचे स्वयंघोषणापत्र, सात बारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकच्या फोटोकॉपी प्रतींसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पीक संरक्षित करावे. तसेच पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, तसेच अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी व बँकेशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. पीक, पीकविम्याचा हप्ता आणि विमा संरक्षित रकमेचा तपशील गहू (बागायती) - विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 35 हजार रुपये - त्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीकविमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्टरी 525 रुपये. ज्वारी (बागायती) - विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 28 हजार रुपये - त्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीकविमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्टरी 420 रुपये. ज्वारी (जिरायती) - विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 26 हजार रुपये - त्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीकविमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्टरी 390 रुपये. हरभरा - विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 24 हजार रुपये - त्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीकविमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्टरी 360 रुपये. रब्बी कांदा - विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 73 हजार रुपये - त्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीकविमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्टरी तीन हजार 650 रुपये. उन्हाळी भुईमूग - विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 38 हजार रुपये - त्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या पीकविमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्टरी तीन हजार 570 रुपये.