तुळजापूर : महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठापैकी एक म्हणजे तुळजापूर, राज्यभरातून मोठ्या श्रद्धेने भक्त तुळजाभवानीच्या दर्शनाला येत असतात. या तुळजाभवानीच्या मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. मौल्यवान माणिक, चांदीचे दोन खडाव आणि विविध राजांनी, त्यांच्या राजवाड्यांकडून दिलेली 71 पुरातन नाणी या मंदिर संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गायब केली आहेत. यासांबंधीचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी आणि विधीमंडळाकडे दिला आहे.


मंदिराचे पुजारी किशोर गंगणे आणि त्यांचे वकील शिरीष कुलकर्णी यांनी मंदिराच्या खजिन्यातील भ्रष्टाचाराच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी केल्या होत्या. 14 फेब्रुवारी 1980 ते 5 मार्च 1981 या कालावधीत पदभार देणारे तत्कालीन उपव्यवस्थापक अंबादास भोसलेंनी घेतलेल्या अहवालामध्ये सोने, चांदी, भांडीपात्र, चांदीच्या वस्तू, पुरातन नाणी यासर्वाचा उल्लेख आहे. यानंतर नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये अनेक पुरातन नाणी गायब असल्याचं समिती अहवालात नमूद केलं गेलं आहे.


मंदिराच्या खजिन्याच्या एकूण अकरा चाव्या होत्या मात्र यापैकी तीन चाव्या हरवल्या आहेत. देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या आहेत. यातील चौथ्या पेटीत अकरा दागिन्यांची नोंद होती, ज्यात चांदीच्या पादुका गायब असल्याचं आढळलं. पाचव्या पेटीतील अलंकारही पळवून नेल्याचं दिसून आलं. मौल्यवान दागिन्यांच्या या चोरीच्या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.


तुळजाभवानी मंदिरातील कोणती नाणी गायब आहेत?


बिकानेर संस्थान-4
औरंगजेब - 1
डॉलर - 6
उदयपूर संस्थान- 3
शहाआलम इझरा- 4
बिबा शुरुक-1
फुलदार-1
दारुल खलिफा-1
फत्ते औरंगाबाद औरंगजेब आलमगीर-1
इंदूर स्टेट सूर्यछाप-1
अकोट-2
फरुखाबाद-1
लखनऊ-1
पोर्तगीज-9
इस्माईल शहा-1
बडोदा-2
रसुलइल्ला अकबर व शहाजहान-4
जुलस हैदराबाद-5
अनद नाणे-20