यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी येथे सासू-सुनेच्या भांडणातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सुनेने गोळी झाडून सासूची हत्या केली आहे. आर्णी येथील शिवाजी नगर येथे ही घटना घडली असून आशा पोरजवार ( वय 60 ) असे मृत महिलेचे नाव आहे तर सरोज पोरजवार असे सुनेचे नाव आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील शिवाजीनर येथे काल ही घटना घडली आहे. अरविंद पोरजवार या भाजी विक्रेत्याचं शिवाजीनर येथे घर आहे. घराच्या बाजूलाच त्याची आई आशा पोरजवार स्वतंत्र राहत होत्या. सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमी शुल्लक कारणांवरून वाद होत असत. चारित्र्यावरून सासू सुनेला टोमणे मारत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय. यातूनच सुनेनं टोकाचं पाऊल उचलत सासूची हत्या केली. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सरोज हिनं घराजवळ राहणाऱ्या सेवानिवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर यांच्या घरून पिस्तूल चोरली. याप्रकरणी गव्हाणकर यांनी पिस्तूल चोरीची तक्रार पोलिसांत दिलीय. सरोजनं चार दिवस ही पिस्तूल घरातच लपवून ठेवली होती. काल तिने सासू घरात पूजा करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. हत्तेनंतर सासू घरात पाय घसरून पडल्यानं मरण पावल्याचा बनाव सरोज हिनं रचला. मात्र, घटनेच्या थोड्या वेळातच तिचं बिंग फुटलं आणि गोळ्या झाडून सासूची हत्या केल्याचं उघड झालं अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सरोज पोरजवार हिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पिस्तूल चालवायचे ट्रेनिंग कोणी दिले?
दरम्यान, या घटनेवर आता काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चोरीला गेलेली पिस्तूल 0.25 mm पद्धतीची असून ही पिस्तूल कशी चालवायची याचं ट्रेनिंग आणि माहिती सरोज पोरजवार हिला कोणी दिली? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nanded Crime: अनैतिक संबंधातून मित्राची हत्या, मृतदेह जाळून हाडे फेकली नदीत; महिन्यानंतर उकललं गूढ
- Satara : बाळ विकत घेणेही कायद्याने गुन्हा; पती पत्नीविरोधात गुन्हा; भांडणामध्ये बाळ मात्र शिशूगृहात
- ऑनलाईन लॉटरी गिफ्ट्सच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक, केमिकल इंजिनियरला साकीनाका पोलिसांनी केली अटक