मुंबई : दसरा मेळाव्याच्या राजकारणात आता करुणा शर्मांनी उडी घेतली आहे. मी वंजारी समाजाची सून आहे, भगवानगडावर दसरा मेळावा (Dasara Melava) मी पुन्हा सुरु करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 


करूणा मुंडे म्हणाल्या, मी वंजारी समाजाची सून आहे. त्यामुळे मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी तो घेणारच आहे. दसऱ्याच्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे  भगवानगडावरील दसरा मेळाव्यात माझ्या मुलीलाही सोबत नेणार आहे. यासाठी मी गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांची भेट घेऊन मेळाव्यासाठीची परवानगी घेणार आहे. 


मी महाराष्ट्राची अशी राणरागिणी आहे की माझं नाव घेताच लोक घाबरतात. परंतु  मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते की, त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली.  एकनाथ शिंदे हेच खरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये आता मी पण  उतरली आहे. मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे. , असे करूणा शर्मा यांनी सांगितले.


दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आता  या दसरा मेळाव्याच्या राजकारणात करूणा शर्मा यांनी उडी घेतली आहे. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय भाषण करण्यास तीव्र विरोध करत पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली. त्यानंतर  भगवानगडापासून 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावरगाव घाटमध्ये  पंकजा मुंडेंनी  दसरा मेळाव्याची नवी परंपरा सुरुवात केली आहे. आता  मी वंजारी समाजाची सून  म्हणत दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी जाणाऱ्या करूण शर्मा यांना नामदेव शास्त्री यांना काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे


भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा 


भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा 1965 ला भगवान बाबांनी गडावर शस्त्रपूजन करून गडाच्या आजूबाजूच्या 25 गावातील भक्तांनी एकत्र येऊन गडावर दसऱ्याच्या दिवशी उत्सव सुरु केला. पुढे हीच परंपरा महंत भीमसेन महाराजांनी 38 वर्षे चालवली. 1993 ला गोपीनाथ मुंडेंनी पहिला मोठा सामाजिक कार्यक्रम घेतला. 2003 साली भीमसेन महाराजांचं निधन झाल्यानंतर समाजाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंनी नामदेव शास्त्रींची गडाचे महंत म्हणून घोषणा केली. 2014 पर्यंत गडावर दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो लोक येत होते. गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने राज्यातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. भगवान गडावर एक स्टेज होतं, ज्या स्टेजवरून गोपीनाथ मुंडे भाषण करायचे. ते स्टेज मुंडेंच्या निधनानंतर तोडण्यात आलं. गोपीनाथ मुंडेंनंतर इतर कोणालाही या ठिकाणाहून भाषण करण्यास मज्जाव करण्यात आला होता