Pune News:  पुण्यातील (Pune) वानवडी येथील बनावट पनीर (Paneer) तयार करणाऱ्या  मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला बनावट पनीर तयार करत असल्याचं आढळून आल्याने कारखान्यावर छापा मारुन साठा जप्त केला. सणासुदीच्या दिवसात बनावट खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. याच काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन सतर्क झालं आहे. 


कारखान्यावर छापा टाकला असता 800 किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले. हे पनीर तयार करण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि  270 किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत 1 लाख 76 हजार 790 रूपये किमतीचे 799  किलो पनीर, 1 लाख 21 हजार 800 रूपये किमतीचे 348 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 39 हजार 664 रूपये किमतीचे 268 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 3 लाख 29 हजार 254 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.


पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सगळे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 


टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा
सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.



मांजरीमध्ये केला होता 899 किलो बनावट पनीरचा साठा जप्त
पुण्यातील बनावट पनीर कारखान्यांवर छापा टाकून सर्व साठा जप्त केला आहे. पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील मांजरीमध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. बनावट पनीर कारखान्यांवर छापा टाकून 899 किलो बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.