मुंबई : 2019 ला भाजपला (Bjp) सोबत घेऊन लढलो, चांगलं यश मिळालं, परंतु, मुंबईत आल्यावर भाजपसोबतची युती तोडल्याची बातमी समजली. भाजप सोडून महाविकास आघाडीबरोबर उद्धव ठाकरे का गेले? उद्धव ठाकरे यांनी युती तोडून देवेंद्र फडवीस यांच्या पाठीत यांनी खंजीर खूपसला, असा आरोप शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ( Dasara Melava) बोलताना शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
मुंईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत आहे. तर शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या दोन्ही मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी बीकेसी मैदानावरून बोलताना शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी बीकेसी मेदानावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत.
"बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना मैद्याचं पोतं म्हटलं आणि त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे गेले. शिवसेनेच्या सर्व आमदारांना फरफटत नेऊन राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं. आम्ही गद्दारी केलेली नाही. 2019 ला भाजपसोबतची युती तोडली ही आमची चूक होती म्हणून आमच्याकडून झालेल्या चुकीचा पश्चाताप म्हणून आम्ही बंडखोरी केली आणि नंतर भाजपसोबत गेलो. जबरदस्तीने केलेली आघाडी आम्हाला पटली नाही त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. बीकेसी मैदानावरील गर्दी पाहून खरी शिवसेना कोणती हे लवकरच कळेल, असा टोला देखील शहाजीबापू पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.
उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख
यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकरी उल्लेख केला. "कोणाकडे फोन असेल तर उद्धव ठाकरे यांना फोन करून येथे येऊन पाहून जा असे सांगा, खरी शिवसेना कोणाची आहे ते त्यांना कळेल, असे शहाजीबापू पाटील यांनी यावेळी म्हटले. परंतु, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबीयांचा कधीच द्वेष करणार नसल्याचे देखील शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या