मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) फुटीनंतर पहिल्यांदाच होणारा दसरा मेळावा जोरदार होण्याचे संकेत असून दोन्ही गटाकडून प्रत्येकी 11 फर्ड्या वक्त्यांची फौज जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे हे प्रमुख वक्ते असून शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील हे वक्ते असणार आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यावर आपल्या भाषणाची छाप कोण पाडणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. 


शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरवात झाली असून गायक नंदेश उमप हे गाण्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत आहेत. तर उद्धव ठाकरे हे संध्याकाळी 7.30 वाजता भाषणाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जातंय. 


शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर यंदा दोन दसरा मेळावा होणार आहेत. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. उद्धव ठाकरे गटाकडून भास्कर जाधव भाषण करणार आहेत. भास्कर जाधव हे शिवसेनेचे फायर ब्रिगेड नेते असून त्यांनी अनेकदा फटकेबाजी करत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर सुषमा अंधारे यांनीही शिवसेनेची बाजू आक्रमक पद्धतीने मांडली आहे. नितीन बानुगडे पाटील हे इतिहास अभ्यासक असून ते आपल्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. आदित्य ठाकरेही भाषण करणार असून त्यानंतर शेवटी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. 


शिंदे गटाकडून स्वत: एकनाथ शिंदे हे भाषण करणार असून आपल्या भाषणासाठी प्रसिद्ध असणारे शहाजीबापू पाटील हे वक्ते असणार आहेत. तसेच गुलाबराव पाटील, संदीपान भूमरे आणि अब्दुल सत्तार हे देखील भाषण करणार आहेत. 


शिंदे गटाकडून कोण भाषण करणार?



  • एकनाथ शिंदे

  • गुलाबराव पाटील

  • रामदास कदम

  • शहाजीबापू पाटील

  • अब्दुल सत्तार

  • तानाजी सावंत

  • दीपक केसरकर

  • भावना गवळी

  • संदिपान भुमरे

  • राहुल शेवाळे

  • श्रीकांत शिंदे


ठाकरे गटाचे हे नेते भाषण करणार?



  • उद्धव ठाकरे

  • भास्कर जाधव

  • नितीन बानुगडे पाटील

  • सुषमा अंधारे

  • अंबादास दानवे

  • किशोरी पेडणेकर

  • सुभाष देसाई 

  • अरविंद सावंत

  • चंद्रकांत खैरे

  • विनायक राऊत 

  • आदित्य ठाकरे