Dapoli Nagar Panchayat Election : दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत हुकुमाचा एक्का असलेल्या शिवसेनेची सर्व सूत्रे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली असून शिवसेना राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आमदार योगेश कदम यांना हा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या यादीतील उमेदवार आता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या आघाडीला काँग्रेसनं साथ दिली आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात वरिष्ठ पातळीवर आघाडी झाल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते मात्र नाराज झाल्याचं बोलले जात आहे.


शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे आमदार योगेश कदम यांनी शिवसेना आणि काँग्रेस आघाडी असल्याचं जाहीर केलं होतं. ही आघाडी जाहीर होताच वरिष्ठ पातळीवरून या आघाडीला नकार देण्यात आला. वरिष्ठ पातळीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करण्यात आली आहे.


दापोली नगरपंचायत निवडणूक वरिष्ठ पातळीवर या दोन पक्षांमध्ये आघाडी झाल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी शहर विकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर विकास आघाडीनं सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. या शहर विकास आघाडीला काँग्रेसनं साथ दिल्यानं बळ मिळालं आहे.


दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी या दोन पक्षांची आघाडी सोडली तर भाजप आणि मनसेनंही स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यामध्ये खूप काळ वितुष्ट आहे. 


सुर्यकांत दळवी सात वर्षांनी मैदानात...


दापोली नगरपंचायत निवडणुकीची सूत्र माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर गेली सात वर्षे राजकारणापासून अलिप्त असलेल्या दळवी यांची कसोटी लागणार आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यामध्ये सख्खे नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार योगेश कदम यांनी विश्वासात न घेता सूर्यकांत दळवी यांच्याकडे सूत्रं दिल्यानं वादाची ठिणगी पडली आहे.


रामदास कदम यांना शह देण्यासाठी... 


योगेश कदम स्थानिक आमदार असतानाही नगर पंचायत निवडणुकीची सूत्रे त्यांच्या ऐवजी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवण्यामागे शिवसेना नेते रामदास कदम यांना शह देण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा आता दापोलीत रंगत आहे. यामागे सोमय्या प्रकरण असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे.


आघाडीचा 9-8 फॉर्मुला दापोली...


नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी ने आघाडी केल्यानंतर जागावाटप निश्चित करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी 9 आणि शिवसेना 8 असा  फॉर्म्युला ठरला आहे. त्याप्रमाणे दोन्ही पक्षाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.


मंडणगड येथील राजकारण ढवळले... 


नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीच्या गोष्टींमुळे मंडणगड नगरपंचायतीचे राजकारण पूर्णपणे बदललं आहे. विद्यमान आमदार योगेश कदम यांना बाजूला सारत नगर पंचायतीची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य संतोष गवळे आणि माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर, माजी उपसभापती राजकुमार निगुडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आल्यानं निवडणुकीचा मार्ग सोपा दिसत असला तरी दोन्ही पक्षातील नाराजांकडून ही निवडणूक अटीतटीची बनवली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे. 


उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संतोष गवळे, माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर, माजी सभापती राजकुमार निगुडकर, रघुनाथ पोस्‍टुरे, दिनेश राठोड, जितेंद्र सापटे, माजी नगरसेवक शांताराम भेकत आणि दशरथ सापटे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. संतोष गवळे यांनी मंडणगड नगर पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याची अधिकृत घोषणा केल्यानं गेले चार दिवस सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पालकमंत्री अनिल परब यांनी नगरपंचायत निवडणुकांची जबाबदारी माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर आणि आमच्याकडे सोपवली असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षाचे एबी फॉर्म आपल्याकडे आले असून चार उमेदवारांच्या अर्जासोबत ते जोडण्यात आले आहेत. या निवडणुकीचा प्रचार करताना माजी आमदार, खासदार अनंत गीते पालकमंत्री अनिल परब आमदार योगेश कदम यांच्यासह शिवसेनेचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेने राष्ट्रवादीशी होत असलेल्या आघाडीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम यांनीही या आघाडीच्या वृत्ताला दुजोरा दिला. यासंदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. या नव्या नाट्यमय घडामोडी राजकारणाला अधिक गती आली आहे. सर्वांचे लक्ष आता पुढील हालचालींकडे आहे.


सर्व गणितं बदलली... 


आमदार योगेश कदम गेल्या वर्ष भरापासून या निवडणुकीची पूर्वतयारी तयारी करत असून त्यांनी जवळ जवळ सर्वच प्रभागात आपले उमेदवार तयार केले आहेत. मात्र नव्या गणितामुळे अशा आता शिवसेना चार जागांवर निवडणूक लढणार आहेत. निवडणुकांची सर्व जबाबदारी शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी गटाकडे गेली आहे. त्यामुळे आमदार कदम आता कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


कॉंग्रेस, भाजप, मनसे, रिपाई यांची भूमिका... 


राज्यात महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत मनसे आणि भारतीय जनता पक्षानं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून गत निवडणुकीत सत्ताधारी आघाडीसोबत असलेल्या रिपाइंची भूमिकाही स्पष्ट झालेली नाही.


राष्ट्रवादीला 11 तर शिवसेनेला 4 प्रभाग... 


अनेक दिवस चर्चेत असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी अखेर प्रत्यक्षात आली असून मंडणगड नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादीला तर 4 जागा शिवसेनेला सोडण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या 4 उमेदवारांचे अर्ज पक्षाचा एबी फॉर्म जोडण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष गवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भात माजी आमदार संजय कदम यांनी आधीच सहमती दर्शवली होती. शिवसेनेकडून मात्र याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने दिलेल्या अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे...


पूजा जितेंद्र सापटे 
श्रद्धा अभिजीत चिले 
संजय शंकर सापटे 
तुषार तुकाराम साटम


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह