Maharashtra Gram panchayat Election 2021 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील सात हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.


सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.


नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा
• भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)
• भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)
• राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802) 
• महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)


जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ 
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.  


मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आज (ता. 6) दुपारी 3 वाजेपर्यंत होता. तो आता सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातवैधता पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील कोणताही पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी उद्या (ता. 7) दुपारी 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे हमीपत्र असेल.