Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain)  जोरदार हजेरी लावलीय. याचा मोठा फटका शेती पिकांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील भंडारा (bhandara) आणि अकोला (akola) जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठे नुकसान झालंय. पपईसह केळीच्या बागा (Damage to papaya and banana) भुईसपाट झाल्या आहेत.   


फळबागांसह भात आणि पालेभाज्या पिकांनाही फटका


भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे. यासोबतचं जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या मिरची या बागायती शेतीलाही याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसानं भात पिकांसह मिरची आणि पालेभाज्याची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. तर, अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.


अकोल्यात शेकडो एकरावरील पपई आणि केळीच्या फळबागा भुईसपाट


अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसलाय. ज्यामध्ये शेकडो एकरावरील पपई व केळीच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. काल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. तर संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळे, भाजीपाला धान्य आणि विविध पिकांचे नुकसान झाले आहे.


पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार


दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. 16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. काही ठिकाणी या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, 'या' तारखेपर्यंत बरसणार पाऊस; पंजाबराव डखांचा अंदाज काय?