Bhendval Ghat Mandni : राज्यामध्ये प्रसिद्ध अशा बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष आज जाहीर करण्यात आले. यावर्षी पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील, तर पाऊसही सर्वसाधारण राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्त होईल. भेंडवळमध्ये करण्यात आलेल्या घट मांडणीत सुरुवातीच्या दोन महिन्यात पावसाळा कमी राहील, तर नंतरच्या दोन महिन्यात भरपूर पाऊस राहिला असाही या घट मांडणीत अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्त होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 



ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल


परकीय देशांपासून देशाला कुठलाही धोका नाही, तर देशाचा राजा कायम राहील असे या गट मांडणीतून समोर आलं आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही मांडणी करण्यात आली होती आणि आज सूर्योदयावेळी या मांडणीचे निरीक्षण करून हे अंदाज वर्तवण्यात आले. भेंडवळच्या घटमांडणीमधून करण्यात आलेल्या भाकितानुसार जून, जुलै हे महिने कमी पावसाचे असणार आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


घटमांडणीतील अंदाजानुसार पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दिसेल. पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत तिसरा महिना एकदम चांगला असून या महिन्यात सर्वत्र पाऊस पडेल. चौथा महिनाही पावसाचा आहे. उपस्थितांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, या घटमांडणीतून मागच्या वर्षी जे भाकित करण्यात आलं होतं ते 90 टक्के खरं झालं आहे. 


घटमांडणीतील भाकितानुसार यावर्षी पाऊस चांगला झाला तरी खरिपाची पिकं साधारण राहतील. तर रब्बीच्या हंगामात गव्हाचं पिक चांगलं येईल, असं सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय काही पिकांवर रोगराईचा परिणाम होण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी येथील घटमांडणीमधून राजकीय भाकित केलं जातं. मात्र यावर्षी आचारसंहिता असल्याने तसं भाकित केलं गेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?


भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.


इतर महत्वाच्या बातम्या