Dam Water Storage Maharashtra: राज्यातील पावसाचा जोर आता ओसरला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असून राज्यातील बहुतांश धरणं काठोकाठ भरल्याचे चित्र आहे. अनेक धरणांमधून विसर्ग होत असून नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे. महाराष्ट्रातील धरणं आता सरासरी ८३ टक्के भरले आहेत. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये आता सरासरी ९३.०६ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साधारण २० टक्के अधिक जलसाठा वाढल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं आहे. राज्यातील मध्यम आणि लघू धरणप्रकल्पांमध्ये सरासरी ७२% आणि 49% पाणीसाठा असल्याचं नोंदवण्यात आलं आहे.


राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पावसाने अनेक भागात नद्यांना पूर आला होता. अतिवृष्टीचीही नोंद करण्यात आली असून हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागात शेतीचे नुकसान झाले असून दुसरीकडे धरणं तुडुंब भरली आहेत.


कोणत्या विभागात काय स्थिती?


जलसंपदा विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणप्रकल्पांमध्ये आज ८३.९२ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी हा पाणीसाठा ६७.४० टक्के होता. यात कोकण विभागातील एकूण १७३ धरणांमध्ये ९३.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुण्यातील ७२० धरणांमध्ये ९०.७६ टक्के तर नाशिक विभागात ७९.२२ टक्के पाणीसाठा झालाय. मराठवाड्यातील ९२० धरणांमध्ये ६८.४१ टक्के पाणीसाठा झाला असून नागपूर ८१.२२ टक्के तर अमरावती विभागात ८७.५१ टक्के पाणीसाठा झालाय.


कोकणातील धरणं तुडुंब


कोकणातील बहुतांश धरणं काठोकाठ भरली असून भातसा धरण ९८.५० टक्के, सुर्या धामणी ९८.५५ टक्के, अप्पर वैतरणा ९२.५२ टक्के तर तिलारी धरण ९४.५० टक्क्यांनी भरलं आहे. सध्या भातसा आणि अप्पर वैतरणेतून विसर्ग सुरु असून भातसा आणि वैतरणेत पाण्याची आवक होत आहे.


मराठवाड्यात धरणांची काय स्थिती?


जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडीत  आज ९८.५७ टक्के पाणीसाठा आहे. दोन दिवसांपूर्वी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. परभणीच्या निम्न दुधनामध्ये आज ७५.०५ टक्के तर पूर्णा येलदरी धरणात ७४.६३ टक्के पाणीसाठा झालाय. बीडच्या माजलगाव धरणात ३९.४२ टक्के तर मांजरा धरणात ७६.९१ टक्के पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे. उर्ध्व पैनगंगा ७०.९६ टक्के भरलं असून तेरणा धरण २५.९२ टक्के भरलंय.


नागपूर, अमरावती विभागात किती भरली धरणं?


नागपूर आणि अमरावती विभागात पेंच तातलाडोह मध्ये ९८.२२ टक्के तर इटियाडोह ८७.४५ टक्के गोसीखुर्द६२.९९  तर निम्न वर्धा ७५.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागातील काटेपूर्णा ७३.२५ टक्के, खडकपूर्णा ९५.३४ टक्के पाणीसाठा भरला आहे.


नाशिक, पुण्यातील धरणं किती भरली?


नाशिकच्या दारणा गंगापूर धरणांमध्ये ९८, ९६ टक्के पाणीसाठा झाला असून शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नगरमधील धरणांमध्येही ९५ते १०० टक्के धरणं भरली आहेत. पुण्यातील डिंभे धरण आता ९८.३९ टक्के भरले आहे. पानशेत ९९.८६ टक्के तर नीरा देवघर भाटघर धरणं १०० टक्के भरली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूरची प्रमुख धरणंही ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत.