ठाणे : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे पॅन क्रमांक चोरुन, त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्याचा गोरख धंदा करणाऱ्या त्रिकुटाला डायगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या त्रिकुटाने आत्तापर्यंत तब्बल 400 डेबीट कार्डचा डेटा चोरून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना ठाणे न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


ठाणेकर असलेल्या वंदना विजय गोरी या त्यांच्या नात्वासह बँक ऑफ बडोदा या एटीएम सेंटरवर दहा हजार रुपयांची रक्कम काढण्याकरता आल्या होत्या. त्यावेळी तीन अज्ञातांनी एटीएममध्ये प्रवेश करून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्या एटीएम कार्डचा डेटा चोरला. त्यानंतर त्याच्या आधारे आरोपींनी 71 हजार रुपये त्यांच्या अकाउंटमधून लंपास केले. या घटनेप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या फसवणूक प्रकरणी गंभीरतेने तपास करीत तांत्रिक तपासाच्या आधारावर तीन आरोपींना बेडया ठोकल्या आहेत. यात आरोपी जमिल अहमद मोहम्मद दरगाही शेख, गोविंद हनुमंत सिंग,आशिष कुमार उदयराज सिंग या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात नेले असता त्यांना 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.


पोलिस पथकांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. सदर आरोपी हे खिशामध्ये  स्किमर घेवून एटीएमवर रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकांचे एटीएम कार्डचा पिन नंबर चोरून बघून त्याला बोलण्यात गुंतवायचे. त्यानंतर हातचलाखीने एटीएम खिशात ठेवलेल्या स्किमरद्वारे डेबिट कार्डचा डेटा चोरी करायचे. तो डेटा दुसऱ्या कार्डवर पेस्ट करीत एटीएममधून पैसे काढण्याचा गोरख धंदा करीत असल्याचं समोर आले. दरम्यान, या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत जवळपास 400 डेबिट कार्डचा डेटा चोरल्याचे उघड झाले आहे. याद्वारे त्यांनी बनावट एटीएम कार्ड बनवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: