'निसर्ग'च्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही, आता तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस
निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. सरकारने तातडीने त्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रायगड : कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना तातडीने भरघोस मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. सरकारने तातडीने त्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आज दिवसभर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात काय झालं?
कोकणातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज दुपारी तीन वाजता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर अलिबाग मधील कोळीवाड्यात देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पोहोचला. चक्रीवादळामुळे कोळी बांधवांच्या बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी केली. यावेळी राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा कोळी बांधवांनी व्यक्त केली.
कोळी बांधवांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस यांचा दौरा रोह्याच्या दिशेने रवाना झाला. रस्त्यामध्ये उसळ गावात चक्रीवादळामुळे पाण्याची टाकी उल्मळून पडली होती. याठिकाणी फडणविसांनी गावकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पुढे हा ताफा वावे गावात पोहोचला. या गावात वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली. या पडझडीची पाहणी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी केली. त्यांनतर हा ताफा रोहा तालुक्यातील घोसाळे गावात पोहोचला. इथं प्राथमिक आरोग्य केंद्रवरील पत्रे पूर्णपणे उडून गेले आहेत. आणि आरोग्य केंद्राचा नुकसान झालेला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी या केंद्राची पाहणी केली. ही पाहणी करून दोन्ही नेते महाड मुक्कामी पोहोचले. उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली जाणार आहे.






















