CYCLONE TAUKTAE :  तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला मात्र सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. शिवप्रभूंची शिवलंका नावाजलेल्या मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्यावर तोक्ते चक्रीवादळामुळे झालेली घरांची, वीज खांबांची झालेली पडझड, मोडून पडलेली झाडे आणि गेले बारा दिवस विजे अभावी जीवन जगणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ले वासीयांपर्यंत आजही सिंधुदुर्गचे प्रशासन बारा दिवस उलटूनही पोहोचलेले नाहीत. तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या मागील भागावर वडाचे झाड पडून नुकसान झाले आहे. तर किल्ल्यातील भवानी आणि महापुरुष मंदिरावरील छप्पर उडून गेले आहे. वीज खाबांची पडझड झाल्याने सिंधुदुर्ग किल्यावर अंधारात आहे. त्यामुळे तोक्ते चक्रीवादळात निसर्गाने झोडपल आणि प्रशासनाने लाथाडल अशी अवस्था झाल्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न सिंधुदुर्ग किल्लावासीयांना पडला आहे.

 

कोकण किनारपट्टीला तोक्ते चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर या इशाऱ्या प्रमाणे तोक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला विशेषतः मालवण व देवगड तालुक्याला जोरदार तडाखा दिला. या तडाख्यात कोट्यावधीच नुकसान झालं. तोक्ते चक्रीवादळनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहित लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ही पाहणी करीत असताना प्रशासनाला सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांनी आमदार खासदारांनी आदेश दिले तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सूचना केल्या. चक्री वादळामुळे निर्माण झालेल्या अजस्त्र लाटांचे फटकारे ज्यांनेे आपल्या अंगावर झेलून साडे तीनशे वर्षानंतरही छत्रपतींच्या नावापोटी रयतेचे म्हणजेच मालवण वासीयांचे संरक्षण केले त्या किल्ले सिंधुदुर्गकडे मात्र राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी दुर्लक्ष तर केलेच पण प्रशासनही किल्ले सिंधुदुर्गकडे फिरकले नसल्याचे उघड झाले आहे. 

 


तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्यात राहणाऱ्या लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाने सिंधुदुर्ग किल्यावरील सादिक शेख यांचे घराचे छप्पर उडून गेले. तर नरेश सावंत यांच्या घराच्या छपराचे पत्रे उडून गेले. श्रीकृष्ण फाटक आणि मधुसूदन फाटक यांच्या घरांच्या छपराची कौलेही उडून गेल्याने या लोकांच्या डोक्यावर आभाळाने छत पांघरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असून हे मंदिर त्यांचे पुत्र राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधले आहे. या मंदिराच्या मागील बाजूस जी छपराची नव्याने डागडुजी करण्यात आली होती. त्याच भागावर झाड पडल्याने मंदिराचे नुकसान झाले आहे. तर श्री देवी भवानी मंदिर आणि महापुरुष मंदिराच्या छपराची कौलेही उडून गेली आहेत.

 

तोक्ते चक्रीवादळाचा फटका एवढा तीव्र होता की सिंधुदुर्ग किल्यावरील वीज खांब या वादळाने जमीनदोस्त केले. आज बारावा दिवस सिंधुदुर्ग किल्लावासीय काळोखात राहत आहेत. रॉकेलच्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात गेले अकरा दिवस राहणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग वासीयांकडे कुणाचेही लक्ष नाही. एवढेच नव्हे तर या चक्रीवादळामुळे किल्ल्यामधील रहिवाशांच्या तीन होड्याही समुद्रात वाहून गेल्या आहेत. घरांची नुकसानी झाली आहे. प्रशासनाला माहीत असूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा करत असल्याचं रहिवाशी मंगेश सावंत याच म्हणणं आहे. 

 



तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्लेवासीय नुकसानग्रस्त बनले आहे. चक्रीवादळाने वीज पुरवठा खंडित केलाच परंतु प्रशासनाने किल्ला रहिवाशांकडे दुर्लक्ष केल्याने सध्यातरी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच अंधार दिसत आहे. सध्या आम्ही चाळीस वर्षापुर्वीचे जीवन जगत आहोत. 1978 पर्यंत किल्ले सिंधुदुर्गवर वीज नव्हती 1979 साली किल्ल्यावर वीज पुरवठा करण्यासाठी विजेचे खांब उभारले गेले आणि 1981 मध्ये किल्ले सिंधुदुर्गवर वीज पुरवठा सुरू झाला. त्यानंतर अनेकदा वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित व्हायचा परंतु काही दिवसातच तो वीज पुरवठा सुरळीत व्हायचा आज वादळ होऊन अकरा दिवस उलटले किल्ले सिंधुदुर्ग पर्यायाने किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिर काळोखात आहे. 


तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग  किल्यामधील विहिरींचे पाणी मचूळ बनले आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांना कुरटे बेटावर म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर गोडे पाणी सापडले होते. छत्रपतीनी किल्ल्यात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी बांधून घेतल्या होत्या. त्यांना दुधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी नावेही दिली होती. साडेतीनशे वर्षानंतरही साखरबावच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात आहे. मे महिन्यात या तीनही विहिरींची पाण्याची पातळी घटते. चक्रीवादळामुळे समुद्राच्या लाटांनी जो किल्ल्यात प्रवेश केला, त्या खाऱ्या पाण्यामुळे या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. साहजिकच गोडे पाणी आणि खारे पाणी यांचा निलाप झाल्याने हे पाणी मचूळ बनले आहे. 





 

पावसाळ्याचे तीन महिने सिंधुदुर्ग किल्यावरील लोकांचा मालवणशी असणारा संपर्क तुटतो. पावसाळ्यात हे रहिवाशी किल्ल्यातच राहतात. त्यांना शासनाकडून तीन महिन्याचे धान्य पुरविले जाते. मात्र पावसाळा जवळ येऊनही या धान्या विषयी शासनाने कोणतीच तरतूद केलेली नाही.