Cyclone Tauktae LIVE : तोक्ते चक्रीवादळामुळं नुकसान, केंद्राकडून गुजरातला एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा
अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. शिवाय किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्राकडून गुजरातला एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत
सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळाचा रेडी बंदराला तडाखा बसला आहे. रेडी बंदरातील दोन मालवाहू जहाज बुडाली तर दोन जहाज नादुरुस्त झाली आहेत. मात्र सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. तोक्ते चक्रीवादळात रेडी बंदरातून वाहतूक करणाऱ्या दोन जहाजांना जलसमाधी मिळाली आहे. तर दोन जहाजचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील मायनींगची मोठ्या प्रमाणात रेडी बंदरातून चीन, जपान, इंडोनेशिया यांसारख्या देशात खनिज वाहतूक केली जाते. मात्र नुकसान झालेल्या जहाजांना किनाऱ्यावर आणून त्यांची दुरुस्ती केली जात आहे.
अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळामुळं अडकलेल्या 34 जणांचा मृत्यू झाला आहे. विविध तराफ्यांवर अडकलेल्यांचा मृत्यू
बार्ज पी- 305 वरील 13 मृतदेह नौदलाच्या हाती. समुद्रात अडकलेल्यांसाठी नौदलाचं ऑपरेशन 707
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर. अलिबागपासून होणार दौऱ्याची सुरुवात. गुजरातमागोमाग पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचा दौरा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष
तोक्ते चक्रीवादळामुळं नुकसान झालेल्या घटकांबाबत आजच्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय राज्यातील लसीकरण प्रक्रियेबाबतचगी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. केंद्रस्थानी मात्र चक्रीवादळामुळं झालेलं नुकसान आणि प्रभावितांना दिली जाणारी मदत यासंदर्भातच चर्चा होणार आहे.
भारतीय नौदलाच्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळामुळे अडकलेल्या 184 जणांना वाचवल्यानंतर INS कोलकाता, INS कोची या युद्धनौका बंदराच्या दिशेनं परतल्या आहेत. अद्यापही शोध आणि बचावमोहिम सुरु असून, INS teg, INS betwa, INS Beas, P81 aircraft आणि सिकींग हेलिकॉप्टरची यात मदत घेतली जात आहे.
सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सातत्याने पाऊस पडत आहे. ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांच्या घरात पाणी साचून घरातील साहित्याचं नुकसान होत आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस पडत आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून 35 नॉटिकल माईल अंतरावर (जवळपास 65 किलोमीटर) अडकलेल्या बार्ज P305 या जहाजावरील 273 जणांचं शोध आणि मदतकार्य अद्यापही सुरुच आहे. काल रात्रीपर्यंत 93 जण बेपत्ता होते तर उर्वरित 180 जणांना वाचवण्यात आलं आहे. वाचवलेल्या काही लोकांना INS कोची युद्धनौकेतून आज आणलं जाईल. नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने गस्त घातली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त बागांचे नुकसान देवगड तालुक्यात झाले असून त्यानंतर मालवण तालुक्यास फटका बसला आहे. तर सर्वात कमी बागांचे नुकसान वैभववाडी तालुक्यात झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागांचे झाले असून केळीच्या बागांचे नुकसान सर्वात कमी आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (आज) बुधवारी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्याला भेट देणार आहेत. वादळाचा सर्वाधिक मारा बसलेल्या दीव भागाला ते भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभावित भागाची हवाई सफर करत ते चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पालघरमधील वडराई समुद्रात रायगड बाजूने येणारे गाल कन्स्ट्रक्टरचे एक जहाज खडकात अडकले होते. यामध्ये 137 जण यामध्ये अडकले होते. दमण कोस्टगार्ड हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सर्व जणांना वाचवण्यात यश आलं आहे.ही माहिती इंडियन कोस्ट गार्डने दिली आहे.
तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग किल्यालाही बसला. किल्यावर जाणारा विद्युत पुरवठा खंडित असून किल्यावरील रहिवाशांना दोन दिवसांपासून अंधारात रहावं लागत आहे. सिंधुदुर्ग किल्याच्या प्रवेशद्वारावरील काही भाग वादळाच्या तडाख्यात उचकटून गेला आहे. तसेच तोक्ते चक्रीवादळामुळे समुद्राच्या अजस्त्र लाटाही किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्यात येत होत्या.
पालघरमधील वडराई समुद्रात रायगड बाजूने येणारे गाल कन्स्ट्रक्टरचे एक जहाज खडकात अडकले असून 137 जण यामध्ये अडकले होते. दमण कोस्टगार्ड हेलिकॉप्टरच्या साहाय्याने 85 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून साधारण एक ते दीड तास लागण्याची शक्यता आहे. पालघर पोलीस विभाग आणि तटरक्षक दलाची टीम घटनास्थळी उपस्थित आहे.
पालघर : जिल्ह्यात वादळी वारा आणि पावसामुळे महावितरणच मोठे नुकसान झाले असून अजूनही 3 लाख 75 हजार ग्राहक अंधारात आहेत. जिल्ह्यातील 38 सब स्टेशनपैकी 11 सब स्टेशन सुरु असून डहाणू तलासरी जव्हार मोखाडा तसेच पालघर तालुक्यातील काही भाग अजूनही अंधारात आहे. महावितरणाकडून पडलेले पोल आणि तुटलेल्या तारा दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. डहाणू तलासरी या 28 किलोमीटरची लाईन दुरुस्त होण्यासाठी साधारण चार तास लागणार असून डहाणू ते मोखाडा हे 60 किलोमीटर लाईन दुरुस्त होण्यासाठी मोठा अवधी लागणार आहे.
कालच्या जोरदार पावसात वरळीत झाड पडून एका महिलेचा मृत्यू. बीडीडी चाळीत राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम असून किनारपट्टी भागात वादळी वारा आणि मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड, कुडाळ, सावंतवाडी भागात सतत वारा आणि पाऊस सुरु आहे.
तोक्ते चक्रीवादळाचा लँडफॉल सुरु झाला असून, पुढील 12 तासांमध्ये टप्प्याटप्प्यानं या वादळाची तीव्रता कमी होणार आहे. पण, याचे परिणाम मात्र प्रभावित क्षेत्रांमध्ये काही तासांपर्यंत दिसणार आहेत.
पालघर जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु असून सकल भागात पाणी साचले आहे कालपासून बहुतांश भागात विजेचे पोल कोलमडून पडल्याने आणि तारा तुटल्याने बत्ती गुल आहे. जिल्ह्यामधील काही ठिकाणचे मोठ्या रस्त्यांसह गावखेड्यांचे रस्तेही झाड उन्मळून पडल्याने बंद आहेत. वादळी पावसाने अनेक घरांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यत या वादळामुळे दोन मृत्यूही झाले असून, माहीम टेम्भीमध्ये एका नांगरलेल्या बोटीला जलसमाधी मिळाली असून इतर दोन बोटींचे नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे दुबार भातशेती, आंबा उत्पादक, विट भट्टी व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक, बागायतदार यांच मोठं नुकसान झालं आहे. अजूनही हा मुसळधार पाऊस कायम असून जिल्ह्यातील दळणवळण बंद पडण्याची पाळी आली आहे, तर काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कही बंद झालं आहे.
तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. भारतीय हवामान विभागाने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.
तोक्ते चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी
या वादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यानंतर तातडीने मदतकार्य त्वरित करण्याचे आदेश दिले.12,500 लोकांना सुरक्षितस्थळी हलण्यात आले आहे.
मुंबईत पाऊस आणि वादळ अपडेट : संध्याकाळी 5 पर्यंत कुलाब्यात 189 मिमी तर सांताक्रूझमध्ये 194 मिमी पावसाची नोंद. मुंबई शहर 105 मिमी, पश्चिम उपनगर 115 मिमी, पूर्व उपनगर 61 मिमी, मुंबईत 489 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना, कोणतीही जीवितहानी नाही. तर 26 घटना घर पडण्याच्या घडल्यात.
तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. किनारपट्टीभागात पावसाचा जोर कायम आहे. तर जिल्ह्यातील 80 टक्के विद्युत पुरवठा अजूनही खंडित आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. उद्यापर्यत जिल्ह्यात पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
ताक्ते चक्रीवादळाचा फटका हा रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला बसला आहे. रायगड जिल्ह्यात धडकलेल्या चक्रीवादळामुळे सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आज सकाळच्या सुमारास रोहा तालुक्यातील घोसाळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावरील पत्र्याचे छत उडून गेले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.
मुंबई हायजवळ जहाजावर 273 जण चक्रीवादळात अडकले, बचावकार्यासाठी नौदलाचं आयएनएस कोची जहाज रवाना, हीरा ऑईल फिल्डजवळ जहाज अडकलं
पालघर जिल्ह्यात वादळाचा प्रभाव अजूनही कायम असून जिल्हा प्रशासनाकडून रात्री 9 वाजेपर्यंत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे . वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
रायगड : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1784 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले. आज दिवसभरात तीन व्यक्तींचा मृत्यू, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब कोसळले. आज दुपारपर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला असून रात्री मालवण मधील आचरा जामडूल, गाउडवाडी,पिरावाडी,पारवाडी भागात उधाणाचे पाणी शिरूर अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. आधीपासूनचं पूर स्थितीला सुरुवात झाली होती. आचरा ग्रामपंचायत कार्यालय,पोलीस स्टेशनलाही पाण्याने वेढा दिला होता. या भागातील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन घरात अडकले होते. काहींना स्थलांतरित केलं गेलं. तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा आचरा परीसराला बसला असून अनेक ठिकाणी घरावर, विद्युत तारांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. देऊळवाडी, वरचिवाडी, हिर्लेवाडीतील काही घरांवर माड, वृक्ष कोसळून मोठी हानी झाली. आचरा परीसरातील मुख्य रस्ते झाडे, विजेचे खांब पडल्याने बंद झाले होते.
उल्हासनगरमध्ये रिक्षावर कोसळले झाड, तीन जण जखमी त्यातील, दोन जण गंभीर, कॅम्प 5,तहसीलदार, गांधीरोड भागातील घटना
पालघर : वाऱ्याचा वेग आणि पाऊस वाढणार असून दुपारी भरती येणार असल्याचे हवामान विभागाने कळविले असल्याने पुढील तीन तास महत्त्वाचे असल्याने. कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. तसेच कच्च्या घरात असल्यास नजीकच्या जिल्हा प्रशासनाने व्यावस्था केलेल्या नजीकच्या शाळेत आश्रय घ्यावा. विजेच्या खांबापासून आणि झाडांपासून नागरिकांनी दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
"तोक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे, पण गुजरात इथे जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. सकाळी आढावा घेतला असून आज दुपारी आपत्कालीन विभागाची बैठक देखील आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दुपारी साडेतीन वाजता बैठक घेणार आहेत," असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. "फळबागांचं नुकसान मोठं झालं असून त्यांचे पंचनामे करायला सांगितले आहेत. नियमानुसार मदत केली जाईलच पण अतिरिक्त मदत करण्याबाबत विचार करु," असंही ते म्हणाले. "SDRF कडून मदत मिळते पण कधी मुख्यमंत्री आऊट ऑफ द वे जाऊन मदत करु शकतात. कोकणात वीज पुरवठा खंडित झाला आहे, तिथला वीज पुरवठा पूर्ववत करणं गरजेचं आहे. त्यानुसार लवकर काम करावं लागेल. बाहेरुन टीम पाठवून काम करावं लागेल. एका बोटींचे काही नाविक गायब आहेत त्याचाही तपास सुरु आहे," असं अजित पवार यांनी सागितलं. दरम्यान "पीककर्ज तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने देणार आहोत. पीककर्जात अडथळा आणू नये अशा सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने खतांचे दर कमी केले नाही तर राष्ट्रवादी याबाबत आंदोलन करणार आहे," अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
मुंबई : हाॅटेल मरिन प्लाझा थोडक्यात बचावलं असून मरिन प्लाझाच्या कंपाऊंड वाॅलवर भलंमोठं झाड पडलं आहे. फायर ब्रिगेड आणि बीएमसीचे कर्मचारी झाड बाजुला करण्याचं काम करत आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हाॅटेलचा जनरेटवर आणि भिंतीचं नुकसान झालं आहे.
नवी मुंबई, पनवेलमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू लागला आहे. सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने अकरा वाजल्यानंतर बरसण्यास सुरुवात केली. यावेळी वाऱ्याचा वेग जास्त आल्याने झाडे उन्मळून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अचानक जोरदार पाऊस येऊन जात असल्याने सकाळी अत्यावश्यक सेवेत कामाला जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पावसात भिजावे लागले.
Cyclone Tauktae LIVE : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ तीन तासांसाठी बंद करण्यात आलं होतं. अशातच आता सूरत विमानतळही बंद करण्यात आलं आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर आता चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर सूरत विमानतळ बंद करण्यात आलं आहे. हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसणार आहे.
अलिबाग : तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचं अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
पुणे : तोक्ते चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील डोंगर माथ्यावर असलेले भोर, मावळ, मुळशी, जुन्नर या तालुक्यात काही घरांचं नुकसान झालं आहे. जोरदार वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले आहेत. अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे. या सगळ्या भागाला आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातील काही भागांना चक्रीवादळाचा फटका बसलाय. मावळातील अनेक घरांचे यात नुकसान झालंय. काहींचे पत्रे उडालेत, काहींच्या भिंती कोसळल्या आहेत, काहींच्या घरांना तडे देखील गेलेत. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना समोर येत आहेत.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा तसंच राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.
नवी मुंबईत काल (16 मे) रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सानपाडा पामबीच रोडवर विजेचा खांब पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल नरळकर हा तरुण रात्री १० वाजता कामावरुन सुटल्यानंतर ऐरोलीला जात होता. सानपाडा इथून निघाल्यावर पामबीचवर स्कूटीवरुन येताच रस्त्यालगत असलेला विजेचा खांब अचानक त्यांच्या डोक्यात पडला. जोरदार हवा असल्याने विजेचा खांब डोक्यात कोसळल्याने विशाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पामबीच रोडवर जुने झालेले विजेते खांब बदलून या ठिकाणी नवीन विजेचे खांब बसवण्यात आले आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच नवीन बसवलेले विजेचा खांब पडला कसा अशी शंका उपस्थितीत केला जात आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि महानगर अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
Cyclone Tauktae LIVE : तोक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशने वाटचाल करत आहे. मुंबईत सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोसाट्याचा वाराही सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ तीन तासांसाठी म्हणजेच, 11 वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रत्नागिरी : चक्रीवादळ हे दापोलीच्या दिशेने पहाटेच सरकलेले आहे.आता त्याचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही जाणवत आहे. गुहागरसह चिपळूण, संगमेश्वरसह, दापोलीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचप्रमाणे या भागांत रात्रभर प्रचंड वेगाने वारे वाहत असल्याने अनेक गावात झाडे उनमळुन पडून घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंबा, काजू बगायतदार यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून या चक्रीवादळाचा परिणाम पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी तसेच ग्रामीण भागात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी बारा वाजेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर दुपारी अडीच वाजता समुद्राला मोठी भरती येणार असल्यानेही उंच लाटा उसारणार असून वादळाचा परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील वसई ते झाई पर्यंतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासना कडून देण्यात आला आहे
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वेगवेगळ्या चौपाट्यांवर NDRF च्या टीम बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दादर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं कोसळल्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफ टीम दादर चौपाटी आणि शिवाजी पार्कला पोहोचलेली आहे
वांद्रे-वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. गरजेच्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.
वादळाचा मध्य रेल्वेला फटका. घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान झाडाची फांदी लोकलवर आली आहे. सीएसएमटी वरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकल वर, लोकल धावत असतानाच झाडाची फांदी तुटून ओव्हरहेड वायरवर पडल्याने संपूर्ण वाहतूक सध्या स्थगित. लोकलमध्ये प्रवासी नसल्याची मध्य रेल्वेची माहिती. मात्र स्लो मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत
वरळी सीफेस रोडवर मोठं झाड पडल्यानं एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वरळी सीफेस कडून हाजीअलीच्या दिशेनं जाणरी वाहतूक वळवण्यात आली आहे.
उरण शहरात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू. बाजारपेठेतील मंदिरा शेजारील भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू. पावसात भिंत अंगावर पडली त्यात एक भाजी विकणारी महिला जखमी.
तोक्ते चक्रीवादळाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. मुंबई लोकलच्या घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान झाडाची फांदी चुकून लोकलवर आली. सीएसएमटी स्टेशनवरुन ठाण्याच्या दिशेने धीमी लोकल जात होती. लोकल धावत असतानाच झाडाची फांदी तुटून ओव्हरहेड वायरवर पडल्याने संपूर्ण वाहतूक सध्या स्थगित केली आहे. लोकलमध्ये प्रवासी नव्हते, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मात्र धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क इथे वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. मुंबईत 35 पेक्षा जास्त झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय फुटपाथचे रेलिंग तुटले आहेत. शिवाजी पार्कमध्ये एनडीआरएफचे 50 ते 60 जवान दाखल होत आहेत.
ठाण्यात रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. जोरदार वाऱ्यामुळे ठाण्यात 13 मोठी झाडे पडली तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 15 झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या असून सहा मोठी झाडे जोरदार वाऱ्यामुळे धोकादायक अवस्थेत आहेत.
तोक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईतल्या विकासकामांना बसलाय, चक्रीवादळापुर्वीच कोस्टल रोडचं काम थांबवण्यात आलंय, समुद्रात काम करणा-या सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आलंय. पुढील काही तास हे काम बंद ठेवण्यात येणार आहे.
कोकणाला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना बसला आहे. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचं मोठं नुकसान झालं होतं. यंदाही तोक्ते चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान झालं. त्यामुळे सरकारसमोर कोकण पुन्हा उभं करण्याचं आव्हान आहे. सरकार तातडीने पंचनामे आणि मदतीची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचं कळतं.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, खेड आणि जुन्नर या घाटमाथ्यांवरील तालुक्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विरारच्या अर्नाळा किल्लामधील किनाऱ्या लगतच्या छोट्या बोटींचे किरकोळ नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग वाढला आहे, अधून मधून रिमझिम पाऊस सुरु आहे. परंतु भरती पूर्ण होऊन ओहटी सुरु झाली असल्यामुळे लाटा जाणवत नाही. समुद्र किनाऱ्यावर महसूल , महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, किनाऱ्यावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे अहवान केले आहे.
तोक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह सातारा जिल्ह्यालाही बसल्याचं चित्र दिसत आहे. काल रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्रभर कोसळत असलेल्या पाऊसामुळे अनेकांचे हाल झालेच शिवाय अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले. या चक्रीवादळाचा तडाखा सातारा शहराबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि कोयना पाटण भागालाही मोठ्या प्रमाणात बसला. महाबळेश्वरात तर गेल्या दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर वीज नसल्यामुळे दोन दिवसांपासून महाबळेश्वरमधील नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहावे लागले आहे.
वसई-विरार : अर्ध्या तासापासून रिमझीम पाऊस सुरु आहे. हलक्या स्वरूपात वारा ही सुटला आहे. मात्र समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्तिथी सध्या नाही. सोसाट्या च्या वाऱ्यामुळे विरारच्या अर्नाळा किल्ला मधील किनाऱ्या लगतच्या छोट्या बोटींचे किरकोळ नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग वाढला आहे, अधून मधून रिमझिम पाऊस सुरु आहे. परंतु भरती पूर्ण होऊन ओहटी सुरु झाली असल्यामुळे लाटा जाणवत नाही. समुद्र किनाऱ्यावर महसूल , महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, किनाऱ्यावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आहवान केले आहे.
सातारा : तोक्ते चक्रीवादळाचा फटका सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वरलाही बसला आहे. साताऱ्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. महाबळेश्वर, पाचगणीत अनेक झाडे उरमळून पडली आहेत. तर महाबळेश्वरात दोन दिवसांपासून लाईट, पाणी नाही. पाचगणीतील अनेक घारांना तडे गेले आहेत. कोयना पाटण मध्येही मोठ्या प्रमाणत झाडे उरमळून पडली, घरांचे पत्रेही उडाले. रात्री सुरु झालेल्या वादळी वा-यासह पावसाचा जोर पहाटे पर्यंत तसाच आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून पावसाला सुरुवात. पहाटे पासून पावसाची संततधार. पहाटे वारा असल्याने विदयुत विभागाकडून वीजपुरवठा खंडित. संततधार पावसामुळे वातावरणात गारवा.
कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून पावसाला सुरुवात. पहाटे पासून पावसाची संततधार. पहाटे वारा असल्याने विदयुत विभागाकडून वीजपुरवठा खंडित. संततधार पावसामुळे वातावरणात गारवा.
रायगड जिल्ह्यात काही भागात पावसाची रिपरिप सुरू झाली असून उरण, पनवेल, पेण परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याचं दिसून येतंय. रात्रीच्या सुमारास श्रीवर्धन, म्हसळा परिसरात जोरदार वारा सुटला होता. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 7 हजार 866 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून वाऱ्याचा वेग मंदावला आहे.
उरण, पनवेल, पेण परिसरात पावसाची रिपरिप सुरू.. रात्रीच्या सुमारास श्रीवर्धन, म्हसळा परिसरात जोरदार वारा. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ७ हजार ८६६ रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले.
तोक्ते चक्रीवादळाचे केंद्र मुंबईपासून सुमारे 150 किमी समुद्रात आहे. त्याच्या प्रभावामुळे- वादळी वारे, समुद्राच्या उंच लाटा अपेक्षित आहेत. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये मध्यम ते जास्त पाऊस, घाट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस (तुरळक मोठ्या सरी). किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे, खांब वाकणे, विजेच्या तारा पडणे, होर्डिंग्ज पडणे, पत्रे उडणे, कच्च्या भिंती पडणे आदी घटना घडू शकतात.
Cyclone Tauktae LIVE : तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. हे चक्रीवादळ मुंबईतील किनारपट्टीला जरी धडकणार नसलं तरी त्याचा प्रभाव मात्र मायानगरीवर जाणवणार आहे. किंबहुना त्यास सुरुवातही झाली आहे.
चक्रीवादळाचा सतर्कतेचा इशारा पाहता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जातं आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरासाठी गडगडाटासह पावसाला सुरुवात. पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार. तोक्ते चक्रीवादळ मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर
तोक्ते चक्रीवादळ मुंबईतील किनारपट्टीला जरी धडकणार नसलं तरी त्याचा प्रभाव मुंबईवर जाणवणार आहे. मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जात आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, युवासेनेच्या राहुल कनल यांच्याकडून तिथे औषधं आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे. गैरसोय झाल्यास करण्यात आलेल्या उपाययोजनांचा वापर करावा असे युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून आवाहन करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पण वारा मात्र कायम, रिमझिम सरी सुरु आहे. जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बत्ती गुल झाली असून बहुतांश जिल्हा अंधारात आहे. तर ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची देखील समस्या निर्माण झाली आहे.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण करण्यात आले. तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग-339, पेण-158, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-0, खालापूर-176, माणगाव-490, रोहा- 72, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर-86, म्हसळा- 397, श्रीवर्धन- 1158. या एकूण 5 हजार 942 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याला धोक्याचा इशारा देण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र उद्या बंद राहणार असल्याची माहिती पालघर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाकडून पश्चिम किनारपट्टीवरील सर्व नागरिकांना आणि मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देत दिला आहे. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजनाही केल्या आहेत. सध्याच्या घडीला सोसाट्याचा वारा सुरू असून समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय.
तोक्ते चक्रीवादळाचा तडका वैभववाडी तालुक्यातील सडूरे-शिराळे गावाला बसला आहे. अनेकांची घरांची कौले, पत्रे उडून गेल्याचे चित्र दिसत आहे. तसेच काही आंबा काजू बागायतदारांचे कलम झाडे, फणस पडलेले आहेत. चक्रीवादळाच्या तडाखा तालुक्यातील अनेक काजु बागायदारांचे नुकसान झालं आहे.
कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागात तोक्ते चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. अनेक घराची छप्पर वाऱ्यामुळे उडून गेली. काही घरांवर झाडं कोसल्यामुळे घरांचं नुकसान झालंय. तर तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
जिल्ह्याच्या किनाऱ्यावर घोंघावणाऱ्या ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम कणकवलीवर झाला. कणकवली तालुक्यातील अनेक घरांवर झाड पडली. काही ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळून रस्ते अजूनही बंद आहेत तर ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडात अनेक घरावर झाड कोसळली आहेत तर विजेचे खांब तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
रत्नागिरी जिल्हात पावसाचा जोर वाढला आहे. समुद्रात देखील उंच लाटा उसळत आहेत. काही ठिकाणी घराचं देखील नुकसान झाले आहे. सध्या 60 किमी प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत आहेत.
तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज सकाळपासून घोंगावत होते. रेडी ते विजयदुर्ग या 120 किलोमीटरच्या जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यात सर्वच भागात चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील 70 ते 80 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यात 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडं पडल्यामुळे बंद आहेत. तर घाटमाथ्याला जोडणारा आंबोली घाटात झाड व दरडी कोसल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यात 100 ते 110 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळ घोंगावत आहे. उद्याही जिल्ह्यात किनारपट्टी भागात वादळी वारे व समुद्र खवळलेला राहील. जिल्ह्यात रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे मस्जिदीवरील पत्रे उडून गेल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय, आंबोळगड, साखरीनाटे, जैतापूर या गावांमधील काही घरांवरी पत्रे देखील उडून गेले आहेत. जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झाला असून नेटवर्कला देखील समस्या आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांवरती झाडे देखील उन्मळून पडली आहेत. देवरूखमधील एका घरावर झाड कोसळलं असून सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप देखील चक्रीवादळाचा प्रभाव दिसत असून साधारण पाच वाजल्यानंतर किंवा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नेमकं नुकसान आणि परिस्थिती समोर येणार आहे. सद्यस्थितीत जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात साधारण 2 हजारच्या आसपास नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
आंबोली घाटात दरडीचा काही भाग कोसळला, रस्त्यावर झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत. वादळी वाऱ्याचा फटका आंबोली घाटात बसला असून काही ठिकाणी दरडीचा भाग व झाडे कोसळून रस्ता बंद. दरड हटवण्याचं काम सुरू
सिंधुदुर्गमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडे पडून बंद. जिल्ह्यातील विद्युतपुरवठा बंद. अनेक गावात घरांसह गाड्यांवर झाडे पडण्याच्या घटना
तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी १२ वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण २७ घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून २ शांळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही वैभववाडी तालुक्यात पडला आहे.
तोक्ते चक्रीवादळ हे अखेर धडकलं असून, कोकण किनारपट्टी भागात याचे परिणाम दिसून येत आहेत. रत्नागिरी, देवबाग, मालवण या भागांमध्ये ताशी 80- 90 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहत आहेत. वाऱ्यांची ताकद इतकी आहे की यामध्ये उभं राहणंही कठीण झालं आहे.
रत्नागिरीमध्ये तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात . रत्नागिरी जिल्ह्यात वादळाने प्रवेश केला आहे. राजापूर तालुक्यात जैतापूर, आंबोळगड भागात जोराचा पाऊस आणि वारा आहे. आतापर्यंत तालुक्यात 632नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. दुपारी 2 नंतर रत्नागिरी आणि आसपास वादळचा प्रभाव दिसेल
तोक्ते चक्रीवादळानं दिशा बदलली असून, सध्या या वादळाचं केंद्र गोव्यात असल्याचं सांगितलं जात आहे. याच्या परिणामार्थ दुपारनंतर मुंबईत सोसाट्याचे वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता आहे.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अतिशय महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि अमित शाह यांची अतिमहत्त्वाची बैठक
तोक्ते चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकताना दिसत आहे. वाटेत केरळ, कर्नाटक या भागांत वादळानं मोठी हानी केली असून, येथील किनारपट्टीभागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कर्नाटकमध्ये 73 गावं प्रभावित झाली असून, मागील 24 तासांत चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचं केंद्र गोवा किनापट्टीपासून 100 किमीपेक्षा कमी अंतरावर; गोवा, सिंधुदुर्गाला वादळ आणि लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता, तोक्तेला आता अतितीव्र चक्रीवादळाचं स्वरुप, हवामान तज्ज्ञांची माहिती
Cyclone Tauktae LIVE UPDATE : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसासह वाऱ्याचा वेग वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून पाऊस कोसळत असून जोडीला ढगांचा गडगडाट देखील आहे. तोक्ते चक्रीवादळाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात संचार बंदी लागू असून कोरोना लसीकरण देखील बंद आहे. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील तोक्ते वादळाचा प्रभाव कमी होईल असा अंदाज आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
रत्नागिरी : तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर सक्रिय होणार असून याचा वातावरणातही प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. मध्यरात्री पासून मुसुळधार पावसाने जिल्हात हजेरी लावली असून आकाशात काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र अंधार पडलेला आहे. जिल्हातील काही भागांत वाऱ्याचा वेग वाढला आहे तर काही भागांत पाऊस पडत आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, रायगड, रत्नागिरी येथे लसीकरणही बंद केलं आहे. याशिवाय संचारबंदीचे आदेशही देण्यात आले असून ,अत्यावश्य सेवांची दुकानंही बंद राहणार असल्याचे निर्देश दिले आहेत.
सिंधुदुर्ग : "अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रिवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे. रविवारी पहाटे 4 वाजता जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी 2 वाजता जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे." असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी देले आहे.
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तोक्ते (Cyclone Tauktae) या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. तसेच 15 मे रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ताशी 50 ते 70 कि.मी. वेगाने तर 16 मे रोजी ताशी 60 ते 80 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ दिनांक 16 मे रोजी अंदाजे पहाटे 4 वाजता गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गच्या समुद्रात येणार असून दुपारी 2 च्या दरम्यान सिंधुदुर्गची सीमा ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे 16 मे रोजी पहाटे 4 ते दुपारी 2 पर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मुंबईत पावसाला सुरुवात..
रायगड : रायगड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाचा हजेरी, माणगाव आणि म्हसळा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, म्हसळा परिसरात जोरदार पावसाची हजेरी, जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, म्हसळा शहरातील वीज पुरवठा खंडित..
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आलं आहे. वादळाचे परिणाम पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. वादळाची परिस्थिती निवळल्यनंतर मंगळवारपासून लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयन्त राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली आहे.
पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या जिल्ह्यात कडक संचार बंदी अर्थात कर्फ्यू असणार आहे. यावेळी नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई असून अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील बंद आहेत. तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरेपर्यत जिल्ह्यात हा नियम लागू असेल. दरम्यान, एकंदरीत वादळाचा अंदाज पाहता उद्याचं लसीकरण देखील बंद असणार आहे. किनारपट्टी लगतच्या ज्या भागामध्ये संभाव्य धोका आहे अशा ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाणार आहे.यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्हा आणि गुजरातच्या तटवर्ती भागात काही प्रमाणात वादळाचा परिणाम होण्याची शक्यता. नागरिकांनी दक्ष रहावे, मुसळधार पाऊस आल्यास घराबाहेर न जाता सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जारी. जिल्हा नियंत्रण कक्ष: 02532317151, मनपा नाशिक: 02532222413.
तौक्ती वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार नौकांनी घेतला देवगड बंदराचा आश्रय. देवगड बंदर नौकांनी फुलून गेले. देवगड बंदर सर्वात सुरक्षित मानलं जातं.ज्या ज्या वेळी अशी स्थिती उदभवण्याची शक्यता असते, त्यावेळी नेहमीच सर्व नौका देवगड बंदराचा आश्रय घेतात. मात्र सध्यातरी फक्त कोकणातीलच बोटींनी देवगड बंदरात आश्रय घेतला आहे. बाहेरील नौकांना विजयदुर्ग बंदरात आश्रयासाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई उपनगरातील मुलुंड कोविड सेंटरमधून ऑक्सिजनवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना इतर रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून रुग्णांना इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे. जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत किंवा ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना स्थलांतरित केलं जाणार आहे. सकाळपासून आठ रुग्णांना हलवण्यात आलं आहे.
तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ. शुभांगी भुते यांनी दिली आहे. मात्र चक्रीवादळामुळे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. तसंच हे चक्रीवादळ गोव्यापासून 350 किमी अंतरावर आहे, असंही त्यांनी सांगितलं. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहनही डॉ. भुते यांनी केलं आहे.
प्रादेशिक हवामान खात्याच्या शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार नाही. पण, दक्षिण कोकणात याचे परिणाम दिसून येतील. तर वादळ दूर जातेवेळी मुंबई, रायगड, पालघर या भागात वारे वाहण्याचा इशारा आहे.
एनडीआरएफची तीन पथकं मुंबईत तर एक पथक गोव्यात तैनात करण्यात आली आहेत. तसेच चौदा पथकं पुण्याच्या सुदुंबरे येथे सज्ज आहेत. चक्रीवादळाने कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर आमच्याकडून सर्वोत्तपरी तातडीची सेवा आम्ही देऊ. : अनुपम श्रीवास्तव, कमांडेट एनडीआरएफ
पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील रहिवाशांना स्थानिक प्रशासनाकडुन सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.मच्छिमाराना समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या.काही नौका किनाऱ्यावर लावल्या गेल्या तर काही नौका आज पहाटे समुद्रात मच्छिमारीसाठी गेल्या.
पुढील 12 तासात तीव्र वादळ आणि त्या पुढील 12 तासात तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. आज गोवा आणि कोकणातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हे वादळ 18 मे ला दुपारच्या सुमारास पोरबंदर ते नलिया किनारपट्टीवर पोहोचणार आहे.
तोक्ते चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मुंबईतल्या लसीकरणाला ब्रेक; आज आणि उद्या मुंबईत लसीकरण बंद ठेवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय; कोविड सेंटर लगतच्या वृक्षांची छाटणी, पाणी उपसण्यासाठी यंत्रणा कार्यन्वित
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनाही त्याबाबत आवाहन केलं जात आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये काल संध्याकाळपासून पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ असून विजा चमकत असल्याचं रात्रीचं चित्र होतं. अद्याप देखील सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं नसून समुद्रामध्ये हळूहळू लाटा उसळत आहेत. पुढील दोन दिवस कोकणाकरता महत्त्वाचे असून निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव पाहता चक्रीवादळाचं संकट टळू दे, अशी अपेक्षा सध्या प्रत्येक कोकणवासी बोलून दाखवत आहे.
तोक्ते (Tauktae) असं नाव असणाऱ्या या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप बेटसमूह, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक (किनारपट्टी आणि त्यालगतचा भाग), दक्षिण कोकण आणि गोवा, गुजरात या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
पार्श्वभूमी
Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे परीक्षेला मुकलेल्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
तोक्ते चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदतकार्य वेगाने सुरु ठेवण्याचे आदेश
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने आज मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत थैमान घातले. यात झालेल्या नुकसानीचा आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.
2 हजार 542 बांधकामांची पडझड
या चक्रीवादळामुळे 2 हजार 542 घरांची अंशत: तर 6 घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात 24, पालघर 4, रायगड 1784, रत्नागिरी 61, सिंधुदुर्ग 536, पुणे 101, कोल्हापूर 27, सातारा 6 अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 2 अशी 4 जनावरे मरण पावली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -