बीड : राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीच्या आखाड्यात आज पाटोद्याचा सुपुत्र राहुल आवारेने बीड जिल्ह्यासह देशाची मान उंचावली. पैलवान राहुल आवारेने कुस्तीत सुवर्णपदक जिंकलं आणि त्याच्या गावात एकच जल्लोष सुरु झाला.


बीडचा पैलवान आणि वस्ताद काका पवार यांचा पठ्ठ्या राहुल आवारेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली. राहुलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं.
राहुलने सव्वा तासात तीन कुस्त्या एकहाती जिंकून ढाण्यावाघासारखी फायनलमध्ये धडक मारली. फायनलध्ये त्याचा मुकाबला कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी विरोधात होता.

यानंतर राहुल आवारेच्या घरासमोर डॉल्बीवर डान्स, फटाके आणि पेढे वाटून साजरा आनंद साजरा करण्यात आला. आपल्या पोराने सुवर्ण पदक मिळवल्याचं पाहून त्याच्या वडिलांनी स्वत:चं डोकं त्याच लाल मातीवर टेकवलं, जिथे मेहनत करुन त्यांच्या ‘लाल’ने देशाचं नाव उज्ज्वल केलं.

राहुलचा धाकटा भाऊ गोकुळही नावाजलेला मल्ल आहे. त्यानेही राज्य आणि देश पातळीवर कुस्तीत पदकं मिळवली आहेत. गोकुळ पाटोद्यात जय हनुमान व्यायाम शाळा चालवतो. 40 मल्ल या मातीत कुस्तीचे धडे घेतात.

राहुलला गोल्ड मेडल मिळावं यासाठी या आखड्यावर बुधवारपासून होमहवन सुरु होता. आपला भाऊ गोल्ड जिंकणारच असा विश्वास असल्याने सामना सुरु होण्यापूर्वीच गोकुळ सेलिब्रेशनची तयारी करत होता.

मागच्या बारा वर्षांत राहुलने कुस्तीत नाव कमावलं आहे. मात्र आज जिंकलेल्या सुवर्ण पदकामुळे राहुलने पाटोद्याचं नाव जगभरात पोहोचवलं. आम्हाला त्याचा अभिमान आहे, असं गावकरी सांगतात.

संबंधित बातम्या

वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!

मरणाची मेहनत करुन पोरगं जिंकलं, राहुलच्या यशाने वस्ताद भारावले

सलग 3 कुस्त्या खेळून दमली, तरीही लढली, बबिताकुमारी रौप्यपदक जिंकली

वायूवेगाने विजय, पैलवान सुशीलकुमारला 80 सेकंदात सुवर्ण!