जळगाव : जळगावातील जामनेर नगरपालिकेवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी झेंडा फडकवला आहे. 25 पैकी 25 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगराध्यक्षपदासाठी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन विजयी झाल्या आहेत.
साधना महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजना पवार निवडणुकीला उभ्या होत्या. मात्र साधना महाजन यांनी 8 हजार 300 मतांनी बाजी मारत अंजना यांचा दारुण पराभव केला.
भाजपला यावेळी 25 जागांवर यश मिळालं असलं, तरी मागील पंचवार्षिक काळात सुरुवातीच्या पहिल्या अडीच वर्षांचा काळ हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या हाती राहिल्याने महाजन यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.
मागील अनुभव लक्षात घेता गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय शक्तीचा उपयोग करुन विजयश्री खेचून आणला. हा विजय गिरीश महाजन यांना जिल्ह्यातील आपली राजकीय पकड घट्ट करण्यास उपयोगी ठरणार आहे.