Custard apple : हिवाळ्यात अनेक फळे बाजारात येत असतात. काही फळं मोसमी असतात. या काळात या फळांचा भावही ग्राहकांच्या आवाक्यात असतो. आपल्याकडे केळी, सफरचंद तर नेहमीच उपलब्ध असणारी फळं. हिवाळ्यात जास्त आवक होत असल्याने सर्वसामान्यांना परवडेल असा फळांचा भाव असतो. एरवी बाजारात 150 ते 200 रुपये भाव खाऊन लालबुंद होणारे सफरचंद. सध्या नांदेडच्या (Nanded News) बाजारात मात्र 100 रुपयांमध्ये दीड ते दोन किलो सफरचंद मिळत आहे. तर नेहमी आवाक्यात असणारा रानातील रानमेवा सीताफळांचे दर चांगलेच वधारले आहेत.
ज्यात सफरचंदापेक्षाही जास्त दर हे सीताफळाचे आहेत. सध्या सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्याने सीताफळांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी आले आहे. यामुळे यंदा सीताफळाचे दर नेहमीपेक्षा जास्त आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यातच काही कालावधीत हे फळ येत असल्याने लोक आवडीने खातात.
आता हा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. तर दुसरीकडे सफारचंदाचा हंगाम आल्याने काश्मीरमधून आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. दरम्यान सफरचंदांची आवक ही प्रामुख्याने काश्मीरमधून होत असते. त्यात यंदा चांगली आवक झाली आहे.तर परदेशांतूनही काही प्रमाणातून आवक होत असते.
दरम्यान नेहमी महाग असणारे सफरचंद यंदा सामान्यांच्या आवाक्यात आले आहे. सीताफळापेक्षाही याचे दर कमी आहेत. 100 रुपयांत दीड ते दोन किलो सफरचंद मिळत असल्याने सामान्य नागरिकही या फळाचा आस्वाद मनमुरादपणे घेत आहेत.
सीताफळ हे डोंगराळ भागात प्रामुख्याने पिकते. या फळाला मोजक्याच पाण्याची गरज असते; मात्र परतीच्या जोरदार पावसाने फळाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे सीताफळांचे दर हे 300ते 400 रुपये डझन झाले आहेत.बऱ्याच ठिकाणी किलोप्रमाणे न विकता डझनने विक्री होत असून 400 रुपये डझन भाव आहे.
केळी हे फळ बारमाही उपलब्ध असते. थंडीच्या दिवसांतही या फळाला चांगला भाव असून 30 ते 40 रुपये डझन असा दर आहे. तर सामान्य लोक हे महाग असल्याच्या कारणावरुन सफरचंद घ्यायचा बहुधा विचार करीत नाही. यंदा मात्र भाव एकदम आवाक्यात असल्याने सर्वच ग्राहक नांदेडमध्ये सफरचंदाची मागणी करताना दिसत आहेत.
ही देखील बातमी वाचा