Cruise Drug Case : क्रूझवरील पार्टी, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक आणि त्यावरुन सुरु झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप. आता या सगळ्या प्रकरणाला धार्मिक वळण मिळताना दिसतंय. कारण या प्रकरणात एक खान अडकल्यामुळं नवाब मलिकांची आरडाओरड सुरु आहे, असा आरोप भाजप नेत्यांनी सुरु केला आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि आर्यन खानच्या धर्माचा उल्लेख करत नवाब मलिकांना काही सवाल विचारले आहेत.


काय म्हणाले नितेश राणे? 


भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "नवाब मलिकांची आदळआपट का सुरु? कारण तो खान आहे, सुशांतसिंह राजपूत नाही. खान आडनाव असल्यामुळे तो पीडित ठरतो का? सुशांतसिंह राजपूत हिंदू होता, म्हणून तो व्यसनाधीन होतो का?" , असे प्रश्न नितेश राणे यांनी ट्वीट करत उपस्थित केले आहेत. 


ट्वीटवरुन एबीपी माझानं नितेश राणे यांच्याशी संवाद साधला. आर्यन खानसोबत काही हिंदू तरुण-तरुणींनाही अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी ट्वीट करत उपस्थित केलेले प्रश्न कितपत योग्य आहेत? असं विचारलं असता ते म्हणाले की, "माझं एवढंच म्हणणं आहे की, जी तळमळ नवाब मलिक या संपूर्ण प्रकरणातून दाखवत आहेत. तर तोच न्याय त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला का दिला नाही? म्हणजे, सर्व धर्मांना एकसमान न्याय, असा दृष्टीकोन का ठेवला जात नाही? इथे ते ज्याप्रकारे दररोज आदळआपट करतायत. तसेच इथे एकंदरीत जे चाललंय त्याबाबत जे मत प्रदर्शन करतायत. त्यावरुन सरळ स्पष्ट होतंय की, हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचं ते काम करतायत. मी फक्त ते नजरेसमोर आणून दिलंय." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सध्या नवाब मलिक ज्या पत्रकार परिषदा घेत आहेत. या सर्व पत्रकार परिषदा ते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन घेत आहेत. ते याप्रकरणी वैयक्तिक काही बोलत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीनं स्पष्ट करणं गरजेचं आहे की, ही त्यांची भूमिका आहे की, नवाब मलिकांची."


काय म्हणाले नवाब मलिक


क्रूझवरील पार्टी आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याबाबत सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना नवाब मिलक म्हणाले की, "मी सल्ला देतो, सावध राहा कधी तुमच्या घरात कोणी घुसेल आणि तुमचीच लोकं तुरुंगात जातील का?", पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी म्हटलो 11 पैकी तिघांना सोडलं. एनसीबी सांगतंय 11 नाही, 14 लोकं होते. आम्ही सगळं फूटेज पाहिलं. तीन लोक सोडल्यानंतर हे फूटेज आम्ही जगासमोर आणलं आहे. मी एनसीबीला आव्हान करतो, की जर 14 लोकं होते, तर आणखीन तीन लोकं कोण होते ते त्यांनी जाहीर करावं. तुमच्या ऑफिसमधून ते लोकं बाहेर पडतानाचं फुटेज जाहीर करा. तेव्हा तिथे चॅनलची लोकंही होतीच. भाजपाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ३ लोकांना सोडलं आहे. ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असं मी पुन्हा म्हणतो"


"एनसीबीचे दिल्लीतील अधिकारी सांगत होते की. आम्ही जागेवर पंचनामा करतो. मी त्यांना विचारू इच्छितो की मागच्या रविवारी रात्री साडेआठ वाजता तुम्ही काही फोटो माध्यमांना पाठवले. चुकून एक व्हिडिओ तुमच्याकडून पाठवण्यात आला. त्यात स्पष्टपणे दिसतंय की जप्ती क्रूजवर किंवा टर्मिनसवर आलेलं नाही. हे फोटो समीर वानखेडेंच्या कार्यालयातले आहेत. मागचे पडदेही समीर वानखेडेंच्या कार्यालयातले आहेत.", असंही नवाब मलिक म्हणाले. 


एनसीबीचं स्पष्टीकरण काय? 


क्रुजवरील कारवाईत काही जणांना सोडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या आरोपांना उत्तर देताना एनसीबीने सांगितले की, चौकशी केल्यानंतर 6 जणांना सोडून देण्यात आले. तर 8 जणांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते. नंतर चौकशी आणि खुलाशांच्या आधारे आणखी 10 लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. 


एनसीबीने सांगितले की, आम्ही सार्वजनिक स्त्रोत आणि इंटेलिजेन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करतो. 2 ऑक्टोबर रोजी, गुप्त माहितीच्या आधारावर आम्ही आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर छापा टाकला आणि 8 लोकांना पकडले. मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि 1 लाखांहून अधिक रोख रक्कम तेथून जप्त केली.