Shirdi Sai Baba Temple: अहमदनगरमध्ये जिल्‍हाधिकारी यांच्‍या प्रतिबंधात्‍मक आदेशानंतर कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या कारणास्‍तव तातडीने श्रींची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक स्थगित करण्‍यात आली होती. परंतु साईभक्‍तांची श्रध्‍दा व त्‍यांची मागणी आणि मंदिराची प्रथा परंपरा सुरू ठेवण्‍याच्‍या उद्देशाने संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी जिल्‍हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्‍याशी तातडीने दुरध्वनीवरुन संपर्क साधून रथयात्रा मिरवणूक सुरू करण्‍याबाबत मागणी करण्‍यात आलेली होती. या मागणीला आता मान्‍यता मिळाली असून 22 मार्चला रंगपंचमी निमित्ताने शिर्डी गावातून श्रींची रथयात्रा मिरवणूक काढण्‍यात येणार आहे.


होळी धुलिवंदन व सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांनी गर्दी केली असून शिर्डीतील बाजारपेठ सुद्धा फुलली आहे. शिर्डीतील सर्वच हॉटेल सध्या हाऊसफुल असून साईनामाच्या जयघोषाने शिर्डीनगरी दुमदुमुन गेलीय. तर यावर्षी होणारा रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतल्याने ग्रामस्थांसह साईभक्तांनी त्याच स्वागत केलय.


यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशनव्ये 17 मार्च ते 22 मार्चपर्यंत पालखी व रथ मिरवणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे फेरबदल करण्‍यात आले होते. परंतु संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना ईमेल करत प्रस्‍ताव पाठवला. तसेच त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संस्थान मार्फत 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमी निमित्त श्री साईबाबांची रथयात्रा मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्‍यास जिल्‍हाधिकारी यांनी मौखीक मान्यता दिली आहे.


संबंधित बातम्या-