World Sparrow Day 2022 : 'या चिमण्यांनो परत फिरा...' अशीच काहीशी म्हणण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे वाढत्या सिमेंटचं जंगल. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे 'चिऊताई' अर्थात चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आज 'जागतिक चिमणी दिवस' या निमित्ताने एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट जाणून घ्या.
शाळेच्या कौलांमध्ये विणलेला गवताचा खोपा, त्यात चिऊताईची भरलेली शाळा, अंगणात वाळत घातलेल्या धान्यांवर ताव मारणारी चिमणी. चिमणीचं वर्णन काहीसं अशाप्रकारे करता आपण करतो. पण, आता हे दृष्य जवळपास हरवलंय आणि याला जबाबदार आपणच आहोत. वाढत्या लोकसंख्येबरोबरच सिमेंटचं जंगल वाढलं आहे. आणि या सिमेंटच्या जंगलात चिऊताईला स्वतःच असं घरंच उरलं नाही.
मागील 13 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात निसर्गप्रेमी, जैवविविधता संशोधन आणि संवर्धन केंद्रातर्फे पक्षीगणना करण्यात येते. या सर्व्हेक्षणात चिमण्यांची घटती संख्या चिंता वाढवणारी आहे.
चिमण्यांची सरासरी घटणारी संख्या :
साल सरासरी प्रमाण
2015 - 33.73
2016 - 32.99
2017 - 26.05
2018 - 22.13
2019 - 21.12
(टीप - कोरोनाच्या काळात सर्व्हेक्षण झाले नाही त्यामुळे गेल्यावर्षीची आकडेवारी मिळू शकलेली नाही. मात्र, अंदाजे ही आकडेवारी 20 टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.)
खरंतर, चिमणी संपली तर तुम्हा-आम्हाला संपण्यासही वेळ लागणार नाही. याचाच एक उदाहरण अवघ्या जगाने अनुभवलं आहे. चीनमधील कम्युनिस्ट विचारांच्या हुकूमशाह माओ जेडॉन्ग याने 1958 साली चिमण्यांना संपण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर जवळपास अडीच कोटी चिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे चिमणी वाचवण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. अहमदनगर येथील डॉक्टर अस्मिता खिस्ती या वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना वेळात वेळ काढून पक्षी संवर्धनासाठी काम करतात. त्यांच्या या कामात त्यांच्या घरच्यांचीही त्यांना मदत होते.
आपली लाडकी चिऊताई वाचवायची असेल तर, आपणही आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात चिऊताईसाठी जागा ठेऊ शकतो. घराच्या एखाद्या कोपऱ्यात चिमणीने खोपा केला तर तो काढू नका. बाभळ, कडूलिंब, कण्हेर या झाडांवर चिमण्यांची घरटी असतात. ही झाडं तोडू नका. उन्ह्याळ्यात चिमण्यांच्या मारण्याचे प्रमाण अधिक असते. त्यांच्यासाठी घराच्या खिडकीत थोडंस धान्य आणि पाण्याची सोय करा.
महत्वाच्या बातम्या :
World Sparrow Day : चिमण्या कुठं गेल्या? आज चिमणी दिन... चिमण्यांना वाचविण्यासाठी 'हे' करूयात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha