Crime News : आई-वडील रागावल्याने एका 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील उमरद येथे ही घटना घडली आहे. एका शुल्लक कारणातून युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत भारत जाधव (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बीड तालुक्यातील उंबरद खालसा या गावाचा रहिवासी आहे चंद्रकांत हा भारत जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. बीडमध्ये शिवण काम करण्याचं काम करायचा. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने वडिलांनी त्याला फोन करून विचारणा केली. त्यावेळी तो नशेत असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी वडिलांनी चंद्रकांतला त्यांनी समज देऊन घरी लवकर येण्यास सांगितले.
रात्री उशिरा घरी परत आल्यानंतर चंद्रकांत हा घरातल्या एका खोलीमध्ये गेला. आई-वडील रागवल्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. या रागातून त्याने त्याच्या खोलीत एका लोखंडी हुकाला गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येतात त्यांनी त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चंद्रकांत हा जाधव कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. गेल्या काही दिवसापासून त्याच्या विवाहासाठी वधूचा देखील शोध सुरू होता. मात्र, शुल्लक कारणावरून त्याने आत्महत्या केल्याने घरातील कर्ता आधारच गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कौटुंबिक वादातून तहसीलदार बहिणीवर सख्ख्या भावाचा जीवघेणा हल्ला
बीडच्या केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कार्यालयात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मधुकर वाघ असे हल्ला करणाऱ्या भावाचे नाव आहे. मधुकर याने कोयत्याने आशा यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले आहेत. या हल्ल्यात नायब तहसीलदार आशा वाघ या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.