Covid 19 Cases in India : देशात सोमवारीही तीन लाखांच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी देशातील कोरोनाची तिसरी लाट कधी कमी होईल आणि राज्यांमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये कधी घट होईल याबाबतची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.


सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीपासून भारतात कोरोना कमी होईल. देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. देशभरातील 74 टक्के प्रौढ लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. परंतु, केरळ येथील कोरोना टास्क फोर्सचे सल्लागार डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितले की, पुढील काही आठवड्यांत ओमायक्रॉनमुळे पसरलेली कोरोना महामारीची तिसरी लाट लहान शहरे आणि गावांमध्ये पसरेल." 
 
महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत भारतात ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होईल आणि त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट संपण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये कोरोना रूग्णांची संख्या पूर्ण पणे कमी होईल. याबरोबरच एप्रिलनंतर भारत कोरोना महामारीतून मुक्त होईल. तिसरी लाट ज्या वेगाने आली तितक्याच वेगाने ती कमी होईल. त्यामुळे एप्रिलनंतर भारत कोरोनामुक्त होईल असा अंदाज आहे. 


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या मते जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस देशात रोज दहा लाखांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळतील. 
महत्वाच्या बातम्या