SSC HSC Examination fees : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून जास्तीचं शुल्क आकारलं जात असल्याची बाब समोर आली आहे. बहुतांशी शाळा कॉलेजेसकडून ही जास्तीची आकारणी केली जात असून त्यामुळं या शुल्काचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्काची पावती देण्याचे आदेश शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना दिले आहेत.
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून किती परीक्षा शुल्क घ्यावं? हे शिक्षण विभागाने ठरवून दिलं आहे. ही रक्कम साधारणपणे ५०० रुपयांच्या घरात असली, तरी अनेक शाळा आणि कॉलेजेसकडून मात्र त्यापेक्षा जास्त, म्हणजे ८०० ते ९०० रुपये विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी च्या नावाखाली घेतात. शिवाय या वाढीव शुल्काची कोणतीही पावती मात्र विद्यार्थ्यांना दिली जात नाही. त्यामुळं या पैशांचा सरळ सरळ अपहार होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावर बदलापूरच्या अतुल चोबे यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मुलीकडून तिच्या कॉलेजनं परीक्षा शुल्क म्हणून ९१० रुपये घेतले होते, तसंच पावती सुद्धा दिली नव्हती. त्यामुळं शिक्षण विभागानं या सगळ्याची गंभीर दखल घेत यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्काची पावती देण्यात यावी, असे आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत. तसंच जर एखाद्या शाळा किंवा कॉलेजनं अतिरिक्त पैसे घेतले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा शिक्षण विभागानं दिले आहेत.
दरम्यान, ज्या कॉलेजवर अतुल चोबे यांनी हा आरोप केलाय, त्या एम. जे. कॉलेजचे प्रशासन प्रमुख राहुल सकटे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. परिक्षा शुल्काची पावती देताना आमच्या क्लार्ककडून टायपिंग करताना चूक झाली असून ती चूक आम्ही मान्य केली आहे. मात्र आम्ही नियमापेक्षा जास्त शुल्क आकारत नसल्याचा दावा राहुल सकटे यांनी केला आहे.
राज्यात दरवर्षी दहावी आणि बारावीला मिळून ३१ ते ३२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामुळं या प्रत्येकाकडून किमान ४०० रुपये जास्त घेतले जातात, असं गृहीत धरलं, तरी हा घोटाळा तब्बल १०० कोटींपेक्षाही मोठा असल्याचं लक्षात येतं. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतही भ्रष्टाचार होत असेल, तर याबाबत वेळीच योग्य पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकरांनी व्यक्त केले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI