जालना : राज्यात उद्याच्या लसीकरणाबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. लसीकरणानंतर अनेक ठिकाणी रिअॅक्शन आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र त्या किरकोळ असून त्याला गांभीर्यानं घेण्याची आवश्कता नसल्याचं टोपे यांनी म्हटले आहे.


दरम्यान कोविन अॅपच्या दुरुस्तीसाठी आम्ही लसीकरण थांबवलं होतं. केंद्रानेही आठवड्यातून चारच दिवस लसीकरणाचा कार्यक्रम राबवायला सांगितला होता. त्याचबरोबर ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन लसीकरण व्हावं अशी विनंतही राज्य सरकारनं केंद्राला केली असल्याचं टोपे म्हणाले.


उद्याच्या लसीकरणाबाबत आढावा घेणार असून कोविन अॅपच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा झाली असल्याचं टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळं उद्या लसीकरण सुरू होणार की नाही हे मात्र अजूनही अस्पष्टच आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ 


देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. शिवाय लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असून त्यानंतर दोन आठवड्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतील, असंही त्यांनी सांगितलं. 'दवाई भी, कड़ाई भी', असा नवीन नारा यावेळी मोदींनी दिला. तसंच कोरोना लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.


केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही


राजेश टोपे म्हणाले की, कोरोना काळात केंद्राने राज्याला पूर्ण सहकार्य केलं आहे. केंद्राच्या कोविड मॅनेजमेंट आणि लसीकरणाच्या मॅनेजमेंटमधले काम चांगले आहे. केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही, असं ते म्हणाले. आजच्या गतीने महाराष्ट्रात तीन महिन्यात लसीकरण पूर्ण होवू शकते, असं त्यांनी सांगितलं. गरज पडली तर महाराष्ट्रात लसीकरणासाठी राज्य सरकार निधी देवू शकते, असं देखील टोपे म्हणाले. महाराष्ट्रात देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत चार पट मृत्यू आहेत असं विचारलं असता ते म्हणाले की, इतर राज्यांनी मृत्यू लपवले असू शकतात.


संबंधित बातम्या :



Corona Vaccination Suspended : कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द


Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Live Updates