LIVE UPDATES | पोलीस कर्मचार्याने परळीतील उड्डाणपूलावरुन मारली उडी
Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी : राज्यमंत्री यड्रावकर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
18 Jan 2021 09:32 PM
परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्याने परळीतील उड्डाणपूलावरुन उडी मारली. ही खळबळजनक घटना रात्री साडे आठला घडली कर्मचार्याने उडी का मारली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुनील घोळवे असे पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. सायंकाळच्या सुमारास घोळवे यांनी शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी उभी केली. त्यानंतर पुलावरुन खाली उडी मारली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे लातुर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन, 'धनंजय मुंडे राजीनामा द्या'; भाजपची मागणी, मुंबईत चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वात आंदोलन.
समृद्धि महामार्गाच्या कामामुळे 5 गावांचा विद्युत पुरवठा खंडित. मेहकर तालुक्यातील साब्रा, फर्दापुर , कंबरखेड, गौढाळा, व कल्याना या पाच गावातील समृद्धी महामार्गावरील कामामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतातील पिकांचं पाण्याविना नुकसान होत आहे. पाच गावातील ग्रामस्थ पाण्यापासुन वंचित असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरील कच्च्या रस्त्यावर मोटरसायकली आडव्या लावून रास्ता बंद केला. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तसेच समृद्धी ठेकेदारकडे सुद्धा कित्येक वेळा गेले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्यांमुळे आता काम बंद करुण रस्ता अडविला आहे जो पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत सुरु केला जात नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच शेतातील पिकांचे पाण्याविना झालेल्या नुकसानाची भारपाई देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे
पालघर -
पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का,3.5 क्षमतेचा बसला धक्का.
अनेक दिवस डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के शमले होते. मात्र आज पुन्हा 10 वाजून 45 सेकंदाच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली आहे. हा धक्का तलासरीमधील अच्छाड, धुंदलवाडी, आंबोली, बहारे या भागात तर डहाणू तालुक्यातील कासा, सुर्यानगर ,धानीवरी, ऊर्से या भागात जाणवल्याची माहिती नागरिकांना दिली आहे
मुंबईत एका 32 वर्षीय तरुणानं ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल 22,000 लोकांना फसवल्याचे समोर आलं असून याद्वारे त्याने 70 लाख रुपयांना गंडा घातला आहे.
कोल्हापूर : बेळगावमधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं आहे. जयसिंगपूर आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर बेळगावला जात होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कोगणोळी जवळ यड्रावकर यांना रोखण्यात आलंयं.
पालघर : समुद्रात मच्छिमारी करत असताना वडराई येथील रमेश नारायण मेहेर यांच्या विश्वसाई नौकेच्या जाळ्यात मोठं समुद्र कासव अडकलं होतं. या कासवाला मच्छिमारांनी जाळ कापून समुद्रात सोडून देत जीवदान दिलं आहे.
पुणे : जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचा निकाल उद्या लागणार. इथं अनेक मल्टि नेशनल कंपन्या असल्या तरी हिंजवडीचा कारभार कोणी चालवायचा हे इथले मतदारच ठरवतात आणि त्यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदारांनी कोणाला कौल दिला हे उद्या स्पष्ट होणार आहे. गावात एकूण साडे चौदा हजार मतदार आहेत, ते 17 जागांसाठी मतदान करतात. पण पैकी चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 13 जागांसाठी 26 उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत कैद केलंय. इथं दोन आघाड्या एकमेकांत भिडलेल्या आहे. गावकी-भावकीच राजकारण इथं असल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये सर्व पक्षीय नेते विभागलेले आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यात बर्ड फ्लू चा शिरकाव झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे मृतावस्थेत सापडलेला कावळ्याला बर्ड फ्लू लागण झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर भानगाव येथील 10 किलोमीटर परिसरातील कोंबड्या आणि अंड्याच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तर 10 किलोमीटर परिसरातील पशुसंवर्धन विभागाकडून निर्जंतुकिकरण करण्यात आलं आहे.
सांगली : आटपाडी येथे मेडिकल असोसिएशन मार्फत आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील( वय 35 रा. ढवळी ता.तासगांव ) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या धक्याने दुर्देवी मृत्यू झाला. काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई : बर्ड फ्ल्यूने जरी राज्यात शिरकाव केला तरी यबाबत भीती न बाळगता चिकन अंडी काहीच हरकत नसल्याचं सांगितलं जातं असलं तरी सुद्धा अनेकांनी चिकन ऐवजी मच्छी मटण खाण्यावर भर दिलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असताना मच्छी, मटणच्या दुकानांवर गर्दी वाढलेली तर आहेच, शिवाय मच्छी मटणचे दर सुद्धा वाढलेले बाजारात पहायला मिळतंय.
रायगड : मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावर अमृतांजन ब्रिजजवळ ट्रेलरला आग लागली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरला आग लागली असून पहाटे सहाच्या दरम्यान ही घटना घडली. ट्रेलरला लागलेल्या आगीमध्ये ट्रेलरची केबिन जळाली आहे.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करून प्रवाशांचे नकली ओळखपत्र बनवून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करणाऱ्या 5 दलालांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथील रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 70 तिकिटे ज्याची किंमत सव्वा लाख रुपये जप्त केली आहे.कोविड महामारी मुळे ज्या प्रवाश्यांच आरक्षण आहे. त्यांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी आहे. याचाच फायदा काही तिकीट दलाल घेत आहेत. ज्या प्रवाश्यांना गावी जायचे आहे त्यांच्या नावाने आय आर सी टी सी या रेल्वेच्या वेब साईटवर बनावट ओळखपत्र तयार करून हे दलाल तिकिटांच्या दुप्पट किंवा तिप्पट पैसे वसूल करत असत. याची माहिती लोकमान्य टिळक टर्मिनसच्या आर पी एफ ला मिळाली.रे रोड या ठिकाणी त्यांनी सापळा रचला आणि 5 जणांना अटक केली आहे.
कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द. सोमवारीही लसीकरण होण्याची शक्यता कमी. ऑफलाईन माध्यमातून नोंदणी करुन लसीकरण करण्याचे केंद्र सरकारच्या सूचना.
साताऱ्यातील अतीत येथे एक धक्कादायक घटना आज सकाळी घडली. व्यायाम करायला गेलेल्या एका 15 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. तुषार कांबळे असे या शाळकरी मुलाचे नाव असून तो नवोदय विद्यालय खावली याठिकाणी शिकत होता. विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या तुषार लॉकडाऊन मुळे घरीच होता. अतीत ते समर्थ गाव या रस्त्यांवरून त्याचा चुलत भाऊ आणि तुषार असे दोघेही धावत निघाले असताना अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत (सीईटी) प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना EWS मूळ प्रमाणपत्र, NCL मूळ प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी 20 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं आहे.
लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथील शेतकऱ्याच्या 9 शेळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोंबड्या पाठोपाठ आता शेळ्या दगावत असल्याने पशु पालकात खळबळ निर्माण झाली आहे.
पत्नीचे निधन झाल्याचे कळताच पतीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना बीडच्या धारूरमध्ये घडली आहे.
धारुर शहरातील शेख रहिम शेख लाल यांच्या पत्नी हसीना वय ५४ वर्षे यांना उपचारासाठी लातूर येथील खाजगी दवाखान्यात चार दिवसांपुर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचार सुरु असताना निधन झाले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले पती शेख रहिम ५८ वर्षे यांना पत्नीचे निधन झाल्याचे कळताच तीव्र हृदयविकाराचा धक्का आला. या धक्क्यात त्यांची तत्क्षणी प्राणज्योत मावळली. शेख रहिम हे शहरातील नामांकित व्यापारी होते. मितभाषी स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. पत्नीवर नितांत प्रेम असणाऱ्या रहिम यांना पत्नी निधनाचे वृत्त सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला. यातच त्यांचे निधन झाले.
पिंपरीतील लसीकरण केंद्रावर राजकीय नेत्यांचा प्रताप, लसीकरण सुरू असताना मनसे गटनेत्यांचा वाढदिवस साजरा
पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण सुरू असलेल्या केंद्रावरच राजकीय नेत्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा प्रताप केलाय. मनसे गटनेते सचिन चिखले यांचा आज वाढदिवस आहे. नवीन जिजामाता रुग्णालयात खासदार श्रीरंग बारणेंच्या उपस्थितीत महापौर माई ढोरे यांनी लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. मग प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना लस टोचली जात होती. तेंव्हा तिथंच एका कक्षात मनसे गटनेते सचिन चिखलेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नेते एकवटले.
10 वी आणि 12 च्या परिक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय सांगितला जाईल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची कोल्हापुरात माहिती. 9 ते 12 वी वर्ग सुरू करताना जी काळजी घेतली तिच काळजी यावेळी देखील घेणार. 10 दिवसात सगळी तयारी करण्यात येणार आहे. 15 ते 16 लाख विद्यार्थी वर्गात आहेत. मात्र, कुणाला कोरोना लागण झाली नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. 2025 पर्यंत शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय शाळेत इंटरनेट पोहचवलं जाईल. माझं शिक्षण माझं भविष्य, शिक्षण क्षेत्रातील नवीन टॅगलाईन.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांचा अपघात, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रेलर, टेम्पो आणि मोटारसायकलचा अपघात, टेम्पोची ट्रेलरला मागून धडक शेडुंगजवळील अपघातात चार जण गंभीर जखमी, अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोठा दाभाडी या गावात हृदय विकाराच्या झटक्याने उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे , त्यामुळे मतदान केंद्राच्या बाजूलाच मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ नातेवाईक व समर्थकांवर आली. प्रभाकर शेजुळ (वय 60) असे निधन झालेल्या उमेदवाराचे नाव असून त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होतेय..
कल्याण पूर्वेकडील पुना लिंक रोड काटेमानवली येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू.
51 वर्षीय शेतकऱ्याची शेतातच गळफास घेऊन आत्महत्या. नागपूर जिल्ह्यातील मानोरा येथील आज दुपारची घटना. वामन शंकर रंगारी (51 वर्ष ) रा. मानोरा असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे.
सदाभाऊ खोत यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका,
सत्ता आणि त्याचा वापर जुलमीपध्दतीने केला ,
दडपशाही पध्दतीने काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला,
परंतू न्यायालयात कोणताही पुरावा काँग्रेसची मंडळी सादर करू शकली नाहीत ,
पोलिसांना दोष देणार नाही. कारण ते हुकमाचे दावेदार होते ,
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबात वाटत होते न्याय मिळेल. मात्र त्या अपेक्षा धुळीला मिळाल्या ,
सभ्य व्यक्ती राजकारणाच्या पटलावर आल्यावर अन्याय कसा करू शकतो हे एक उदाहरण आहे,
सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील 'मीडिया ट्रायल' विरोधातील याचिकांवर सोमवारी फैसला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सकाळी 11 वाजता देणार निकाल. मुंबई पोलीस दलातील माजी अधिका-यांसह, सेवाभावी संस्था, व्यक्तींच्या याचिका
आमदार सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांची दोन खटल्यातून निर्दोष मुक्तता, कराड जिल्हा न्यायालयाने दिला निकाल ,
2012 मध्ये ऊस दरासाठी केले होते आंदोलन,
आजपर्यंत कराडमधील 47 खटल्यातून मुक्तता,
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना केले होते आंदोलन ,
कराड पोलीस ठाण्याच्या 47 गुन्हे दाखल करण्यात आले होते,
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांवर केले होते गुन्हे दाखल
धनंजय मुंडे प्रकरणाची सर्व बाजूने माहिती घेतली. या प्रकरणी खोलवर जाऊन तपास करण्याची गरज आहे. त्यासाठी एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्यानं या प्रकरणाची चौकशी करावी: शरद पवार
कायद्यापेक्षा कोणताही मंत्री मोठा नसल्याचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
एकनाथ खडसेंची भोसरी भूखंड प्रकरणी ईडीकडून गेल्या एका तासापासून चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसेंची मुलगी शारदा खडसे-जाधव ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. एकनाथ खडसेंची आरोग्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तुर्तास धनंजय मुंडे यांच्यावर एफआयआर दाखल होण्याची शक्यता कमी आहे. संबंधित महिलेविरोधात आणखी चार तक्रारी आल्याने पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत.
प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत दडवला. मृतदेह दडवून ठेवलेल्याच घरात तरुणाचं वास्तव्य. बोईसरमधील घटनेनं पोलीसही चक्रावले. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली.
भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे आज ईडी चौकशीला सामोरे जाणार. मुंबईतील ईडी कार्यालयाला छावणीचं स्वरुप, पोलिसांचा मोठा फौजफाटा, चारही बाजूच्या रस्त्यांना बॅरीकेडिंग, राज्य राखीव पोलीस दलाची सशस्त्र तुकडीही तैनात
परभणी : देशभरामध्ये इंधनाचे दर वाढले असून परभणी तर तब्बल 93 रुपये 68 पैसे या दराने पेट्रोल विक्री केली जात आहे. तर डिझेलचीही 82 रुपये 65 पैसे या दरानं विक्री केली जात आहे. आजपर्यंतचं सर्वात महाग इंधन आज परभणीमध्ये विकलं जात आहे. त्यामुळे इतर वाहतूक नियंत्रणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 26 पैसे इतकी वाढ सोलापुरात झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे 91.25 पैसे तर डिझेलचे दर
80.33 पैसेवर पोहोचले आहेत. मागील तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सोलापुरात पेट्रोलचे दर प्रति लिटर 90.77 रुपये होते तर डिझेलचे दर 79.81 पैसे इतके होते. मात्र आज पेट्रोलचे आणि डिझेल दर वाढतच आहेत. कोरोनामुळे आधीच उद्योग व्यवसाय बुडालेल्या सर्वसामान्यांना आता पेट्रोलची मार सहन करावी लागतेय.
देशभरामध्ये इंधनाचे दर वाढले असून परभणी तर तब्बल 93 रुपये 68 पैसे या दराने पेट्रोल विक्री केली जात आहे तर डिझेलही 82 रुपये 65 पैशाने विक्री केली जात आहे. आजपर्यंतचं सर्वात महाग इंधन आज परभणीमध्ये विकलं जात आहे. त्यामुळे इतर वाहतूक नियंत्रणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
देशभरामध्ये इंधनाचे दर वाढले असून परभणी तर तब्बल 93 रुपये 68 पैसे या दराने पेट्रोल विक्री केली जात आहे तर डिझेलही 82 रुपये 65 पैशाने विक्री केली जात आहे. आजपर्यंतचं सर्वात महाग इंधन आज परभणीमध्ये विकलं जात आहे. त्यामुळे इतर वाहतूक नियंत्रणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
गोंदिया : गोंदियातील सहयोग रुग्णालयाच्या गेटसमोर 40 वर्षीय व्यक्तीची हत्या, काल रात्री अकराच्या सुमारास रवी बोबडे यांचा धारदार शस्त्राने खून, हत्या केल्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव,
राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव,
पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत सामावेश,
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
सरस्वती देवीचे छायाचित्र ठेवल्याने साहित्यिक यशवंत मनोहर ह्यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला
प्रकाश आंबेडकर--
धनंजय मुंडेंबाबत शरद पवारांनीच सांगितलं आहे की हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी हे कसं घ्यायचं हे ठरवावं.
शरद पवारांनी गुन्हा गंभीर आहे असं म्हटलय. त्यामुळे इभ्रत वाचवण्यासाठी राजीनामा घ्याला लागेल.
कधी ना कधी गुन्हा बाहेर पडतोच. हा राईट टाईम असं म्हणुयात.
मेळघाटच्या धारणी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक करीता आलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर देशमुख यांच्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याने पोलीस विभागात दुख:च सावट पसरलं आहे.. अमरावती मुख्यालय मध्ये कार्यरत किशोर भास्कर देशमुख (वय 57 वर्ष) आज सकाळी धारणी येथे आपल्या ड्युटीवर तैनात असलेल्या धारणीच्या उपविभागीय कार्यालय येथे आपली निवडणूक कर्तव्य पार पाडत होते.. तेव्हा त्यांना आज दुपारी 12 वाजता अचानक उपविभागीय कार्यालयात चक्कर आली आणि त्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..
ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली बाजूला असणाऱ्या मेंढ्यांवर अचानक पलटी झाल्यानं , जवळपास 20 मेंढ्या चिरडून ठार झाल्या आहेत.ही घटना बीडच्या माजलगाव - परभणी महामार्गावर काही वेळापूर्वी घडलीय. तर घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाले आहेत. दरम्यान या अपघातात मेंढीपालकाचं लाखोंचं नुकसान झालं असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी मेंढीपालकानी केली
धनंजय मुंडे काल मला भेटले, त्यांनी मला सविस्तर माहिती दिली. व्यक्तिगत हल्ला होईल याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी आधीच हायकोर्टात अर्ज केला होता. त्यांच्यावरील आरोप गंभीर, चर्चा करुन लवकरच निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार
राष्ट्रवादीतील अनेकजण धनंजय मुंडे यांच्या बाजूने. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर कोणी इतक्या वर्षांनी तक्रार करून ब्लॅकमेल करत असेल तर हे योग्य नाही. याबाबत जी चौकशी सुरू आहे ती पूर्ण झाल्यावर निर्णय झाला पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या बाजूने पक्षात मोठा गट.
धनंजय मुंडे मला भेटले आणि आरोपासंदर्भात माहिती दिली, त्यांनी आपली भूमिका आधीच मांडली आहे, पक्ष म्हणून योग्य तो निर्णय लवकरच घेऊ : शरद पवार
धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर : शरद पवार
धनंजय मुंडे मला भेटले आणि आरोपासंदर्भात माहिती दिली : शरद पवार
नवाब मलिक हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते, त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झालेले नाही. त्यांच्या नात्यामधील व्यक्तीवर आरोप झाले असून त्यांना संबंधित यंत्रणेने अटक केली आहे : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल उपस्थित आहेत. या बैठकीत धनंजय मुंडे प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मेट्रो कारशेडवरून मनसेनं शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. कारशेडच्या मुद्द्यावरून मनसे थेट आता रस्त्यावर उतरली आहे. कारशेडवर वाढणारी किंमत आणि त्याचा मुंबईकरांना बसणारा फटका यावरून मनसे आता मुंबईतल्या विविध भागात निदर्शने करणार आहेत. याची सुरुवात
आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून केली. या आंदोलनाला संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
सांगली : पलूस तालुक्यातील नागठाणे परिसरातील शेती शिवारात दोन गव्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मागिल काही दिवसांपूर्वी नागठाणे आष्टा रस्त्यावर एक गवा आढळलेला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या जंगली गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. नागठाणे येथे ऊस पिकांचे मोठे क्षेत्र आहे त्यामुळे त्या ठिकाणी लपण्यासाठी खुप जागा आहे. या परिसरात शेतकऱ्यांची घरेही मोठ्या प्रमाणात आहेत त्यामळे शेतकऱ्यांबरोबरच इतर नागरिकांची या रस्त्यावर ये-जा सुरु असते. या परिसरात जंगली गव्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली : महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोना लसीचे 12 हजार डोस आज सकाळी 9 वाजता पोहोचले. यावेळी लस वाहतूक करणाऱ्या गाडीचे स्वागत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांच्या उपस्थितीत झाले. उद्या 16 जानेवारी पासून जिल्हयात आरोग्य कर्मचारी यांच्या कोरोना लसीकरणाला शुभारंभ होत आहे. गेले वर्ष झाले कोरोना संसर्गामुळे जगभर या लसीची प्रतिक्षा होती. राज्यासह देशात 16 रोजी पहिल्या टप्याालत कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यात 6 हजार कर्मचा-यांना पहिल्या व दुसऱ्या 28 दिवसानंतरच्या दोन्ही डोजसाठी 12 हजार डोजचा साठा उपलब्ध झाला. यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी पुढिल आठवडयात साठा उपलब्ध होणार आहे. आज आलेल्या 12 हजार कोरोना लस आवश्यक तापमानात ठवण्यात आल्या आहेत.
मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई : कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांचं राजकारण करु नये, शरद पवार यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. तसेच महाविकास आघाडी सरकारला या घटनेमुळे कोणताही धोका नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं. त्याचसोबत शेतकरी कायदे मागे घेतले तर सरकारची प्रतिमा ही अधिक उजळेल, सरकारनं समन्वय दाखवावा आणि एक पाऊल शेतकऱ्यांसाठी मागे यावं, असंही संजय राऊत म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलासाठी अभिनव उपक्रम राबवला आहे. पोलीस दलासाठी काय करता येईल?, पोलिसांसाठी काय योजना करता येईल यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील माजी मुंबई पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस महासंचालक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 15 जानेवारी म्हणजेच उद्या मुंबईत हा कार्यक्रम होणार आहे.
नागपूर : नायलॉनच्या मांजामुळे दुचाकी चालक जखमी होत आहेत तर काहींचे मृत्यू होत आहेत. ही स्थिती लक्षात घेत नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा संदर्भात सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. आज या प्रकरणी पहिली सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वाशिम : कोरोनाची लस आज येणार उद्या येणार, म्हणत आज रात्री उशिरा कोरोना प्रतिबंधक लस 'कोविशिल्ड'चं आगमन झालंय. वाशीम जिल्ह्यातील चार ग्रामीण रुग्णालयांमधून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. आरोग्य परिमंडळातून वाशिमसाठी एकूण साडे हजार डोज देण्यात येणार आहेत. वाशीम जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन लसीकरणाच्या तयारीला लागलेय. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील पोलीस सफाई कर्मचारी शिक्षक महसूल कर्मचाऱ्यानां आणि वयोवृद्ध नागरिकांना हि लस दिली जाणार आहे
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे
सकाळपासून कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना पार पडलं आहे. लस घेतलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळालं. लसीकरणाचा पहिला टप्पा तीन ते चार महिने चालेल, अशी माहिती एबीपी माझाच्या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की, लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या सूचना संपूर्ण राज्यासाठी बंधनकारक आहेत आणि त्यांच्या सूचनेचे स्वागत होत आहे. देशामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र शासनाच्या वतीने जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही चुकू नये एवढी काळजी घेतली आहे, असं ते म्हणाले.
टोपे म्हणाले की, आज देण्यात आलेल्या कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. थोड्या टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आहेत. लसीबाबत शासन आणि वैज्ञानिकांवर विश्वास ठेवा. यात सहभाग घेऊन सकरात्मक प्रतिसाद देऊन सुरक्षित राहावे असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले की, सर्वांच्या चेहऱ्यावर मी आज आनंद पाहिला. नर्स, वार्ड बॉय यांच्या लसीकरणाच्या वेळी मी त्यांच्यासोबत होतो. हे लसीकरण चांगले पार पडण्याचा मला विश्वास आहे, असं ते म्हणाले.
केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी : राज्यमंत्री यड्रावकर
कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ म्हणजे, कोरोना विरोधातील लढाईचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असून ही लसीकरण मोहीम राज्यात प्रभावीपणे राबविली जाईल, असे सूतोवात राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. तसेच केंद्र शासनाने कोरोना विरोधातील लस मोफत देण्याच्या यादीत दारिद्र रेषेखालील घटकांचा समावेश प्राधान्याने करावा अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केली आहे. काल कोल्हापूर जिल्ह्यातील कोविशिल्ड या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयामधून करण्यात आला.
कोरोना महामारी आणि लसीकरणासाठी 24X7 कॉल सेंटर; हेल्पलाईन नंबर जारी
कोविड -19 विरुद्ध देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. सर्वात आधी फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविड 19 महामारी, लसीकरण सुरुवात आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक समर्पित 24x7 कॉल सेंटर - 1075 - देखील स्थापन करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, कोविड 19 साथीचे रोग आणि लसीकरणाविषयी माहिती मिळावी यासाठी 24 तास कॉल सेंटर सुरू केले आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोना लसीकरणाबाबत विविध माहिती साठी 1075 हा नंबर सर्वांसाठी देण्यात आला आहे.