Ajit Pawar Rohit Pawar meet : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा एकहाती विजय झाला, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. अशातच आज यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतीसंगमावर अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. अशातच आज प्रीतीसंगमावर पवारांच्या तीन पिढ्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या. शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते. यावेळी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार आमने-सामने आले. त्यावेळी काका अजित पवारांना पुतण्या रोहित पवारांनी वाकून नमस्कार केला. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, ऑल द बेस्टही म्हटलं.
यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रीतीसंगमावर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांनी हजेरी लावली. त्यावेळी रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले. त्यावेळी रोहित पवार चक्क अजित पवारांच्या पाया पडले. काका-पुतण्याच्या भेटीनंतर आणि त्यावेळीच्या दोघांमधील संवादानंतर राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना हस्तालोंदन केलं आणि त्यांना काकाच्या पाया पड, असं म्हणत खाली वाकून नमस्कार करण्यासाठी आग्रह केला. रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर... असा टोलाही अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
रोहित पवार आणि अजित पवारांच्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?
रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले, रोहित पवारांनी अजित पवारांना पाहून हात जोडले...
अजित पवार : दर्शन घे दर्शन... काकाचं...
त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला...
अजित पवार : अरे ढाण्या थोडक्यात वाचलास... माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं... बेस्ट ऑफ लक...
या संवादानंतर दोघेही निघून गेले...
पाहा व्हिडीओ : Rohit Pawar Meets Ajit Pawar : ढाण्या थोडक्यात वाचलास... दादांचा रोहित पवारांना टोला
काकांच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, "अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती..असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केलं, असं रोहित पवार यांनी सांगितले."