मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे आता पालक वर्गासाठी मात्र एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या 20 दिवसांत राज्यातील लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतोय. 11 ते 20 वयोगटातील हजाराहून अधिक मुलांना गेल्या 20 दिवसांत कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पण ही गोष्ट जास्त काळजी करण्याची नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 


एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. पण मुलं बाधित होण्याचं प्रमाण काही अंशी वाढलं असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरीही या वयोगटामध्ये मृत्यूचं किंवा गंभीर रुग्णांचं प्रमाण वाढलं नसल्याने अधिक चिंता करण्याची गरज नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. चिमुकल्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांच्या लसीकरणासाठी केंद्राकडे आग्रह धरल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलीय. 


लहान मुलांच्या लसीकरणासाठी राज्य सरकार आग्रही
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये 11 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे त्यांचं लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकार केंद्राकडे आग्रह धरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


जगभरामध्ये आता 11 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. आपल्याकडे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु नाही. पण या वयोगटातील मुलांना जर कोरोनाची लागण झाली तर त्याचा प्रसार हा वृद्ध वयोगटातील व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता आहे. या मुलांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी हे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरला आहे. 


टास्क फोर्स काय म्हणतं? 
राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करावं आणि मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे. अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने  दिलाय.


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha