Owaisi in solapur : आपले कुटुंब वाचवण्यासाठी, घोटाळे लपवण्यासाठी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली आणि धर्मनिरपेक्षता जमिनीत गाडली असल्याची टीका एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. शिवसेनेला तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणवता आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात, असेही ओवैसी यांनी म्हटले. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी 11 डिसेंबर रोजी मुंबईत धडक देणार असल्याचे म्हटले. 


ओवेसी यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना शिवसेनाही भाजपसारखीच जातीयवादी असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम असल्याचे म्हटले. मात्र, सत्ता स्थापन केली तेव्हा हेच पक्ष एकत्र आले आणि मुस्लिमांना धोका दिला असल्याचे म्हटले. शरद पवार. राहुल गांधी यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावे. तुम्ही सन 1992 मध्ये काय झाले हे विसरलेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की, बाबरी मशिद आम्ही पाडली आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीला लाज वाटली नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही ओवेसी यांनी म्हटले. 


अजित पवार 48 तासाचे नवरदेव


केवळ तुमचा परिवार आणि कुटुंब वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत आहात असे सांगत अजित पवार हे 48 तासांसाठी नवरदेव देखील झाले होते. फडणवीस आणि अजित पवार यांनी लग्न केले. यामध्ये वधू कोण याची माहिती शरद पवार सांगतील अशी शेलकी टीकाही ओवेसी यांनी केली. 


मुस्लिम आरक्षणाची गरज 


ओवेसी यांनी आपल्या भाषणात मुस्लिम आरक्षणाची बाजू मांडली. मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण हवं होतं. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने ते दिले नाही. मुस्लिमांपैकी 83 टक्केजणांकडे शेत जमिन नाही. तर, 62 टक्के मराठा समाजाकडे अडीच एकर जमिन आहे. ज्यांच्याकडे जमिन आहे, त्यांना आरक्षण दिले जात आहे. तर, ज्यांच्याकडे जाळण्यासाठी तेल नाही, त्यांना आरक्षण नाही. असेही ओवेसी यांनी म्हटले. 


अमरावती हिंसाचारावरून सरकारवर टीका


ओवेसी यांनी अमरावती हिंसाचारावरून राज्य सरकारवर टीका केली. अमरावतीमध्ये घडलेली घटना चुकीची आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखता येईल. कसले सरकार चालवताय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एमआयएम कायम हिंसाचाराविरोधात आहे,  असेही त्यांनी सांगितले.