Sanjay Raut on ST Strike : एसटी संपामध्ये तेल ओतण्याचं काम कोण करतेय हे सर्वांना माहिती आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'एसटी कर्मचाऱ्यांविषयी सर्वांना सहानभूती आहे. पण त्यातही आग लावली जातेय. आग कोण लावतेय, हे सर्वांना माहित आहे. ' शरद पवार यांच्यासबोत अनेक विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील, राजकीय आणि एसटी संपासह विविध विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. परमबीर सिंहांबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करावी, इतका मोठा आणि गंभीर विषय नाही. राज्यात इतरही महत्वाचे विषय आहेत. त्या विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली.


एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल, याची मला खात्री आहे. एसटी संपाबाबतच्या आपल्या भूमिकावरुन शरद पवार यांनी परिवाहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली.  या चर्चेनंतर एसटी संपाबाबत तोडगा निघेल, शी आशा आहे,असे संजय राऊत म्हणाले. ‘एसटी संपला राजकीय वळण लागलेय, अनिल परब यांच्या निवासस्थानी शाईफेक झाली. शाईफेक करणारे एसटी कर्मचारी नव्हते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतेय? आणि का भडकवतेय? त्यामागील हेतू काय आहे, हे सर्वांना माहित आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण आणि का करतेय? यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न आमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. ‘


एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी सर्वांना सहानभूती आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करता येईल, ते सरकार करतेय. सोमवारी शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यामध्ये या विषयावर चर्चा झाली आहे. आज शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला असं समजलं की, शरद पवार यांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले. 


पहाटेच्या शपथविधीचे चंद्रकांत पाटील यांना झटके : 
नवीन वर्षांमध्ये राज्यातील सरकार जाणार आहे आणि गुडीपाडव्याला राज्यात नवीन सरकार येणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले, याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘ हे सरकार जाईल म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे. त्यांना बोलत राहू द्या. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानं सरकार जात नाही, हे सर्वांना माहित आहे. ते भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष आहेत. त्यांना असं बोलणं गरजेचं आहे. हे सरकार पुढील 25 वर्ष टिकेल असा विश्वास आहे. ’ पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्ष झाले आहेत. याच शपथविधीचे झटके चंद्रकांतदादा पाटील यांना बसत असतील. म्हणून ते सारखं सरकार पडेल असं म्हणत आहेत. झोपेतून जागे व्हा, इतकच मी त्यांना सांगू शकतो, असेही संजय राऊत म्हणाले.