पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एका महिलेसह चौघांना पुणे सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पुण्यातील मुंढवा केशवनगर भागात नातेवाईकाकडे सुट्टीसाठी आलेल्या 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. विशेष न्यायाधीश एस.के कऱ्हाळे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. महिलेला सामूहिक बलात्कार प्रकरणी शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.


या प्रकरणी मुंडव्यातील सर्वोदय कॉलनीत राहणाऱ्या मनोज सुरेश जाधव, वर्षा धनराज गायकवाड ,अजय दिपक जाधव आणि खराडी येथील प्रशांत गुरूनाथ गायकवाड यांना शिक्षा सुनावण्यात आली.

पीडित मुलगी तिच्या नातेवाईकाकडे 13 एप्रिल 2016 ते 25 मे 2016 दरम्यान राहण्यास आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला होता. शिक्षा सुनावण्यात आलेली वर्षाही पीडित मुलीची नातेवाईक आहे. पीडित मुलीने झालेल्या सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

या खटल्यात पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले. अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पहिले तर सहायक पोलीस निरिक्षक पल्लवी मेहेर यांनी तपास लावला. आरोपींना पाच हजार रुपये आणि 20 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वर्षावर विश्वास ठेऊन पीडित मुलगी तिच्या घरी गेली होती मात्र तिनेच पीडितेवर आत्याचार करण्यासाठी आरोपींना मदत केली. म्हणून तिच्यावर दया दाखवता येणार नाही, असं न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात महिलेला शिक्षा देता येत नव्हती. मात्र 2013 साली या कायद्यात बदल करण्यात आला. त्या आधारावर वर्षा गायकवाड हिला शिक्षा सुनावण्यात आली आहे.