मुंबई : समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून युतीचा महामार्ग बांधण्याचे प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणण्याचे जोरदार प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केले आहेत. त्याप्रमाणे समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गासोबतच शिवसेना-भाजप युतीचा महामार्गही सुसाट वेगाने सुरु करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र शिवसेनेने 'रोडरोमियो'सारखे मागे येऊ नका, असं दटावल्यामुळे सेनेच्या कलाने घेत आणि एकटं लढण्याची तयारी करत भाजपचे सर्व प्रयत्न सुरु आहेत.
महामार्गाचं भूमिपूजन नागपूरमध्ये होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी अद्याप संपर्क साधण्यात आला नसला, तरी त्यांनाही निमंत्रण दिले जाण्याचे संकेत मिळत आहेत.
समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून आधीच करण्यात आली आहे. सुरुवातीला, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचं विचार करणाऱ्या भाजपकडून, शिवसेनेप्रमुखांच्या नावाबाबतही गांभीर्याने विचार सुरु असल्याची माहिती आहे.
शिवसेनेची मागणी पूर्ण केल्यास दोन्ही पक्षांतील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी हातभार लागू शकतो, अशी अटकळ भाजपने बांधली आहे. त्यामुळेच वाजपेयींच्या नावाचा आग्रह सोडून सेनेची मागणी मान्य करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं म्हटलं जातं.
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर 700 किमीवर येणार आहे. अवघ्या आठ तासात हे अंतर कापणे शक्य होणार आहे. औरंगाबादहून नागपूर किंवा मुंबईला चार तासात पोहचता येणार आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार असून 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या महामार्गाशी येणार आहे.
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2019 10:21 AM (IST)
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासोबतच शिवसेना-भाजप युतीचा महामार्गही सुसाट वेगाने सुरु करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देऊन सेनेला चुचकारण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -