कोल्हापूर: लग्नाच्या वरातीत ध्वनी प्रदूषण करून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या डॉल्बी मालकासह वरपक्षाला कोर्टाने 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दहा महिन्यांची कैदही कोर्टाने सुनावली.

 

पोलिसांनी कोल्हापुरात पहिल्यांदाच वरातीतील डॉल्बीवर कडक कारवाई केली आहे. त्यामुळं याची अनेकांनी धास्ती घेतली आहे.

 

शुक्रवार पेठेतील रोहित नामदेव पाटील यांनी त्यांच्या भावाच्या लग्नानंतर, वरातीसाठी डॉल्बी सिस्टिम भाड्याने मागवली होती. बुधवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत डॉल्बी सुरू ठेवून आवाज मर्यादेचा भंग केला. वाहतुकीलाही मोठा अडथळा करणाऱ्या डॉल्बी चालकाने पोलिसांचे आवाहन धुडकावून डॉल्बी सुरूच ठेवल्याने पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हे दाखल केले.

 

रोहित पाटील यांच्यासह डॉल्बी मालक अनिकेत रमेश आयरेकर, जनरेटर मालक सचिन संभाजी जगताप आणि ट्रॅक्टर मालक प्रभाकर अशोक कोराडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला.

 

न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौघांना प्रत्येकी 16500 रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास दहा महिन्यांची शिक्षाही सुनावली. चार आरोपींना एकूण 66 हजार रुपये इतकी दंडाची रक्कम भरावी लागली.

 

या कारवाईबाबात मात्र रोहित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केलेला गुन्हा कबुल करुनदेखील पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही आणि कोर्टाने इतका मोठा दंड ठोठावला. पण गणपती आणि इतर सणसमारंभात डॉल्बी लावला जातो, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, मग लग्नाच्या वरातीत कारवाई करुन पोलिसांनी काय मिळवलं असा प्रश्नही रोहित पाटील यांनी विचारला आहे.

 

पोलिसांनी शहरात गेल्या काही महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमांतील डॉल्बींवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र पहिल्यांदाच लग्नाच्या वरातीतील डॉल्बीवर कारवाई केली.

 

अलिकडे लग्नाच्या निमित्ताने रात्रभर डॉल्बीचा दणदणाट करण्याचे प्रकार वाढले आहेत. डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्यांना कोर्टाच्या निर्णयाने मोठा दणका बसला आहे.