रत्नागिरी :  चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाणप्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज चिपळूण न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे निलेश राणे यांना आजची रात्र तुरुंगात काढावी लागण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्याविरोधात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.

 

न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे निलेश राणे यांनी खेड सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणीनंतर निलेश राणेंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

 

दरम्यान, संदीप सावंत यांना मारहाणप्रकरणी शरण आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांना आज सकाळी चिपळूण पोलीसांनी अटक केली . हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे, निलेश राणे यांना पोलिसांसमोर हजर राहणं आवश्यक होतं.  त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं.

 

दुसरीकडे या मारहाण प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यांकडून तडकाफडकी तपास काढून घेण्यात आला आहे. प्रमोद मकेश्वर यांनी निलेश राणेंविरोधात पुरावे गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यांच्याकडून हे प्रकरण आता चिपळूणचे डीवायएसपी महादेव गावडे यांच्याकडे देण्यात आलं आहे.

 

त्यामुळे आज निलेश राणे पोलिसांसमोर हजर राहात असताना पोलीस निरीक्षक मकेश्वरांकडून तपास काढून घेणं निव्वळ योगायोग आहे की आणखीन काही?...हा प्रश्न आहे.

 

काय आहे प्रकरण?

मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये  निलेश राणे यांची सभा होती. परंतु या सभेला संदीप सावंत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले नाहीत. याच रागातून संदीप सावंत यांना चिपळूणजवळच्या घरातून मुंबईला नेण्यात आलं, तसंच प्रवासादरम्यान गाडीत मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

 

स्वत: निलेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.

 

संदीप सावंत यांच्या पत्नीचा दावा

दरम्यान, संदीप सावंत यांनीही  काय प्रकार घडला याबाबतची माहिती माध्यमांना दिली. “स्वत: निलेश राणे आणि त्यांचे बॉडिगार्ड आमच्या घरी आले. त्यावेळी आम्ही जेवत होतो. निलेश राणेंनी संदीप यांना खाली येण्यास सांगितलं. त्यानंतर खाली गेल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून घेऊन गेले,” असं संदीप सावंत यांच्या पत्नीने सांगितलं.

 

यानंतर रात्रभर संदीप सावंत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागत नव्हता. पहाटे पाचच्या सुमारास आमदार नितेश राणेंना फोन केला. मग राणेसाहेबांच्या पत्नीला फोन केला, त्यांनी थोड्यावेळानंतर संदीप घरी पोहोचतील असं सांगितल्याचं संदीप सावंत यांच्या पत्नी म्हणाल्या.

 

निलेश राणेंची प्रतिक्रिया

दरम्यान, ही माझ्याविरुद्ध राजकीय खेळी असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे. तसंच संदीप सावंत 10 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाहीत म्हणून आरोप करत असावेत, असंही निलेश राणे म्हणाले.

 

संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे

दरम्यान संदीप सावंत हा आमचा कार्यकर्ता असून, आम्ही आमचं बघून घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिली. नारायण राणे यांनी 27 एप्रिलला ठाणे रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या संदीप सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 

संबंधित बातम्या


अटक टाळण्यासाठी निलेश राणेंची धावाधाव


निलेश राणेंवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा


संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे


संदीप सावंतांना कुठलीही मारहाण नाही, नारायण राणेंचा दावा