मुंबई :  ड्रग्जची (Drugs)   काळी दुनिया एवढी मोठी झाली आहे की, याची उलाढाल अरबो रुपयांमध्ये होतेय. अमली पदार्थांच्या निर्मिती आणि तस्करीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने अंडरवर्ल्डही (Under World) यात सक्रिय झालं आहे.  गोवा, हिमाचल प्रदेशची कुलू व्हॅली, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे ही शहरे आता ड्रग्ज रेव्ह पार्ट्यांसाठी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. बंगळुरू हे रेव्ह हॉटस्पॉट म्हणूनही उदयास आले आहे. जाणकारांच्या मते वर्षभरात जेवढी अमली पदार्थांची विक्री होत नाही, तेवढी विक्री डिसेंबर महिन्यात होते. यात उच्च प्रतिचे अमली पदार्थ चढ्या भावाने विकून अधिकाधिक नफा तस्कर कमवतात.  त्यामागे मोठे अर्थ चक्र असल्यामुळे दरवर्षी अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होते.


अंमली पदार्थ खरेदी विक्री व्यवहार दिसतो, तितका सोपा नाही. बीट कॉईनवर हा व्यवहार होतो. ‘डार्क’ आणि ‘डिप’ अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशीप घ्यावी लागते. बीट काईनवर ही मेंबरशीप मिळते. एक बीट कॉईन 50 लाख रुपयांचा झाला आहे. या इंटरनेट साईटवर मेंबर होण्यासाठी बीट कॉईन खरेदी करावे लागतात. मात्र नुसते बीट कॉईन खरेदी करून देखील तुम्हाला मेंबर केले जाईल याची कोणतीही खात्री नसते. जोपर्यंत  तुम्ही खरच अंमली पदार्थाची खरेदीसाठी मेंबर बनत आहात याची खात्री पटत नाही. तोपर्यंत तुम्हाला मेंबर करून घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे एखादा मोठा तस्करच परदेशातून अंमली पदार्थ मागवू शकतो. त्यामुळे त्यांना पकडणे अवघड झाले आहे.


अंडरवल्डचा सहभाग 


देशातील मोठ्या अंमली पदार्थ तस्करांपैकी एक असलेला इकबाल मिरची आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये 25 मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 16 मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत.याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत.
मुंबईतही त्याच्या 500  कोटीपेक्षा अधिकची मालमत्ता होती. 14 ऑगस्ट, 2013 मध्ये मिरचीचा लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे मृत्यू झाला होता.  त्यावरून अंमली पदार्थ तस्करीचे जाळे फार मोठे असल्याचे निष्पन्न होते. अंमली पदार्थांची उलाढाल एक लाख कोटींहून अधिक असल्याचे बोलले जाते. भारतातील बड्या तस्करांपैकी कैलास राजपूत, अली असगर सिराजी यांचेही परदेशी तस्करांसोबत संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते.


तीन वर्षांत साडे पाच हजार कोटींपेक्षा अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त


तीन वर्षांमध्ये मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांवविरोधात कारवाई वाढवली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत साडे पाच हजार कोटींपेक्षा अधिक किमतीची अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहेत. नाशिक, सोलापूर, नालासोपारा, सांगली, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येक एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने व राजस्थानमध्य एक अशा एकूण आठ मोठे कारखाने मुंबई पोलिसांनी उद्धवस्त केले आहेत.अंमली पदार्थांविरोधात कारवाईत आरोपीच्या ताब्यातून अंमली पदार्थ जप्त होणे आवश्यक असते. सराईत आरोपी त्यांच्याकडे ताब्यात अंमलीपदार्थ ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध करणे फार कठीण होते. तसेच सध्या मानव विरहीत तस्करी केली जाते. त्यासाठी कुरिअर सेवा, डार्कनेट यांचा वापर केला जातो. याशिवाय परदेशातून अमलीपदार्थ भारतात आणण्यासाठी कंत्राटी पद्धतीचा वापर जातो. पैसे देऊन संबंधीत व्यक्ती फक्त भारतात अंमली पदार्थ घेऊन येतो. त्याला या टोळीबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे मुख्य म्होरक्यापर्यंत पोहोचणे कठीण असते, असे अधिकाऱ्याने सांगितले.


दरवर्षी मुंबई व परिसरातून किमान 400 परदेशी नागरिकांना भारतातून हद्दपार करण्यात येते. त्यात 95 टक्के आफ्रिकी देशातील नागरिक विशेष करून नायजेरियन नागरिक असतात. यावर्षी केवळ 2022 आणि 2023  कालावधी मुंबई एफआरआरओ विभागाने देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 500  हून अधिक परदेशी नारिकांची मायदेशी रवानगी केली. त्यातील काही व्यक्ती बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करत होते.  काही जणांनी पारपत्र व व्हिसा यांच्या संबंधीत नियमभंग केले होते. तर काही व्यक्तींविरोधात भारतात गुन्हे दाखल होते, त्यांची शिक्षा भोगून झाल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यात आले. पण कागदपत्रांच्या अभावी अनेक वेळा त्यांचे देशही त्यांना घेण्यास नकार देतात.


हे ही वाचा :


नागरिकांच्या जीवाशी खेळ, बीडमध्ये दूध पावडरच्या 600 गोण्या जप्त; भेसळयुक्त निर्मितीचा डाव फसला