धुळे : गेल्या वर्षी झालेला अवकाळी पाऊस, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या घसरलेल्या किमती, देशांतर्गत बाजारात खरेदी न झालेला कापूस आणि शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान, या बाबी विचारात घेऊन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(सीसीआय)अर्थात भारतीय कापूस प्राधिकरणाने येत्या 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच तब्बल आणखी सात महिने हमी भावाने कापूस खरेदी करण्यास मुदतवाढ दिली आहे. सीसीआयच्या स्थापनेपासून गेल्या पन्नास वर्षात आजतागायत कधीही कापूस खरेदीला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली नाही, असे जाणकारांचे मत आहे. या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

या संदर्भात महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे सल्लागार तसेच खानदेश जिनिंग-प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी सीसीआयच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी अली राणी यांची बेलापूर येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. यासंदर्भात डॉ. पी अली राणी यांना निवेदनही दिलं. यावेळी राणी यांनी तातडीने निर्णय घेत हमी भावाने कापूस खरेदी योजनेला 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत वाढ दिल्याचं ज्ञानेश्वर भामरे यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसचा फटका कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झालाय. त्याची झळ भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे, असंही ज्ञानेश्वर भामरे यांनी सांगितलं.

कापूस खरेदी केंद्रावर गाड्यांच्या तीन किमीपर्यंत रांगा, शेतकऱ्यांवर ताटकळत बसण्याची वेळ

सीसीआयचे केंद्र राज्यात बंद होण्याच्या मार्गावर 

गेल्यावर्षी देशभरात कापसाच्या सुमारे तीन कोटी गाठीचे उत्पादन झाले होते. यात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 90 लाख गाठींचा आहे. भारतीय कापूस प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 50 लाख गाठींची हमीभावाने खरेदी करण्यात आली. तरी अजूनही सुमारे 30 ते 35 लाख कापूस गाठी शेतकऱ्यांच्या शेतात खरेदीविना पडून आहेत. राज्यात एकाधिकार योजना बंद होऊन अनेक वर्ष लोटली. त्यानंतर खासगी व्यापार्‍यांकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. शेतकऱ्यांच्या या पांढऱ्या सोन्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज होते. यासर्व गोष्टींची दखल घेऊन भारतीय कापूस प्राधिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी होऊ लागली. सीसीआय शेतकऱ्यांकडून 5 हजार 450 रुपये प्रतिक्विंटल या दराने कापूस खरेदी करत आहे. तर खुल्या बाजारात खासगी व्यापारी शेतकऱ्याकडून 5 हजार 100 रुपये या दराने कापूस खरेदी करत आहे. सीसीआय मार्चअखेर कापूस खरेदी बंद करते, त्यानुसार सीसीआयचे केंद्र राज्यात बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

बीड जिल्हयातील बंद असलेली शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी : पंकजा मुंडे

इतिहासात प्रथमच सात महिने कापूस खरेदी केंद्र सुरू राहणार

खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री केल्यास शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल चारशे रुपयांचा तोटा होत आहे. शेतकऱ्यांना हा तोटा होऊ नये म्हणून ज्ञानेश्वर भामरे यांनी सीसीआयच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अली राणी यांची बेलापूर येथील कार्यालयात भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी, व्यथा निदर्शनास आणून दिल्यात. या संदर्भात त्यांनी एक निवेदनही सादर केलं. या निवेदनावर सीसीआयच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अली राणी यांनी तातडीने निर्णय घेत हमी भावाने कापूस खरेदी योजनेला 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत वाढ दिलीय. म्हणजेच यंदा प्रथमच सीसीआय आणखी सात महिने हमी भावाने कापूस खरेदी करणार आहे. सीसीआयच्या गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात मार्चनंतर आजपर्यंत कापूस खरेदी झालेली नाही. मात्र, यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आल्यानं डॉ. पी. अली राणी यांनी हमी भावानं कापूस खरेदी योजनेला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे सल्लागार, खान्देश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी सांगितलं.

Cotton Loss | अवकाळी पावसामुळे यवतमाळमधील कापूस भिजला