गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीचा तपास अकोला पोलिसांकडून होत नसल्याने बेपत्ता मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी आपल्या मुलीबरोबरच जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 14, ऑक्टोबर या दोन महिन्यांत तब्बल 35 मुली गायब झाल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली होती. न्यायालयाने याप्रकरणी अकोला पोलिसांना जाब विचारत तपासाच्या गतीवर नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी नागपूर खंडपीठानं थेट अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांना न्यायालयात हजर होण्याचे समन्स बजावले होते.
अकोला मुली बेपत्ता प्रकरण | पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली, दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन, गृहमंत्र्यांचे आदेश
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरही पोलीस तपासात प्रगती होत नसल्यानं मुलींच्या पालकांनी अखेर 'एबीपी माझा'कडे धाव घेतली होती. 'एबीपी माझा'नं हे प्रकरण लावून धरल्याने सरकारनं या प्रकरणाची दखल घेतली होती. पोलीस तपासात असंवेदनशीलपणा दाखविणाऱ्या दोन तपास अधिकाऱ्यांच्या गृहमंत्री अनिल देशमुखांनी निलंबनाचे आदेश दिले. तपास अधिकारी भानूप्रताप मडावी आणि प्रणिता कराळे यांचा यामध्ये समावेश होता. याबरोबरच जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या बदलीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांना बेपत्ता मुलीला शोधण्याचे आदेश दिल्यानं पोलिसांसाठी अकोल्यातील हे प्रकरण प्रतिष्ठेचा विषय झाला होता
मुलीच्या पालकांनी मानले 'माझा'चे आभार
'एबीपी माझा'च्या पाठपुराव्यानंतर गृहमंत्र्यांनी मुलीला शोधण्याचे आदेश दिले होते. या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या पालकांसोबत 'एबीपी माझा' संपूर्ण ताकदनिशी सोबत होतं. आज मुलींच्या पालकांनी 'एबीपी माझा'चे आभार मानलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण :
वर्ष 2019 मध्ये विदर्भातील सहा जिल्ह्यांतून 1 ते 35 वयोगटातील 926 मुली गायब झाल्यात. तर अकोल्यात ऑगस्ट ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल 35 मुली बेपत्ता झाल्या आहेत. यात तपास होत नसल्यानं आज सापडलेल्या बेपत्ता मुलीच्या वडीलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने थेट अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांना दोनदा न्यायालयात हजर होण्याचे फर्मान सोडलं. मात्र, त्यानंतर तक्रारदार पालकांचीच पोलिसांनी छळवणूक चालवल्याचा आरोप बेपत्ता मुलीच्या वडिलांनी केला.
पोलीस अधीक्षकांकडून तक्रारदाराला धमक्या
याबाबत एबीपी माझाशी बोलताना किरण ठाकूर यांनी सांगितलं की, माझी मुलगी 6 महिन्यापासून बेपत्ता आहे. त्यासाठी आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करत होतो. मात्र पोलीस कोणतेही दखल घेत नव्हते. त्यानंतर मी नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली. तेव्हा मला वारंवार पोलीस अधीक्षकांकडून धमक्या दिल्या जात होत्या. तुम्ही कोर्टात का गेले? मीडियात का गेले? आता आम्ही तपास करणार नाही. अनेकदा तक्रार करण्यासाठी गेलो असता आणि माझ्या मुलीचा तपास करण्याची मागणी केली असता मला हाकलून दिलं गेलं. त्यानंतर आज मी गृहमंत्री यांना भेटलो त्यांनी त्या पोलिसांवर कारवाई केली, असं ठाकूर म्हणाले.