मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत.


महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.


राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी




  • पिंपरी चिंचवड मनपा - 12

  • पुणे मनपा - 16

  • मुंबई - 39

  • नागपूर- 4

  • यवतमाळ - 4

  • नवी मुंबई - 3

  • कल्याण - 4

  • अहमदनगर - 2

  • रायगड - 1

  • ठाणे - 1

  • उल्हासनगर - 1

  • औरंगाबाद - 1

  • रत्नागिरी - 1


राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, 'नव्या कोरोना बाधितांची जी संख्या समोर आली आहे. ती ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संसर्गातून झाली आहे. आपल्या सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वांना शिस्तीचं आणि नियमांचं पालन करणं आवाहन करतो, विनंती करतो. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून गरज असेल तरच बाहेर पडा, तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठीच बाहेर पडा, असं आवाहनही बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.


पाहा व्हिडीओ : 31 मार्चपर्यंत मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र येणार नाहीत, वृत्तपत्र विक्रेत्यांचा निर्णय



राज्यातील वाढलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीबाबत सांगताना राजेश टोपे म्हणाले की, 'राज्यात एकूण 15 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 14 रूग्ण मुंबईतील आहेत, तर एक पुण्यातील आहे. यांपैकी 10 लोकांना संसर्गातून कोरोनाची बाधा झाली आहे. यांमध्ये रूग्णांच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे.'


महाराष्ट्रात सध्या संचारबंदी लागू असूनही ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील संचारबंदी ही कायदेशीर बाब आहे. त्यामुळे जर कोणी शिस्तभंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 'मीच माझा रक्षक, याचं पालन करून स्वतःची काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे. जर कोणी नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल.'

संबंधित बातम्या : 

Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू

Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची

coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती

Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद