रत्नागिरी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विळख्यात सहा दिवसांपासून ते सहा महिन्यांच्या बाळापर्यंत सर्वांनाच घेरले. पण, या बाळांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या लढ्यात आईचे दूध कोरोना विषाणूला भारी पडल्याचे आता समोर येत आहे. कारण, 14 एप्रिल रोज रत्नागिरीमध्ये साखरतर या गावातील बाळाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. दरम्यान बाळाला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. त्याकरता वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला. यामध्ये आई आणि बाळाला ठेवण्यात आले. विशेष बाब म्हणजे बाळाच्या आईला मात्र कोरोनाची लागण झालेली नव्हती. बाळावरच्या उपचारा दरम्यान डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. बाळाची आई देखील बाळासोबत त्याच वॉर्डमध्ये होती आणि बाळाला स्तनपान करत होती. सरकारनं दिलेल्या गाईडलाईननुसार हे उपचार सुरू होते. बाळाला दूध देताना आईदेखील काळजी घेत होती. त्याचे परिणाम देखील सकारात्मक दिसून आले आहेत. कारण, दहा दिवसांनंतर बाळाचा कोरोनाचा दुसरा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. यामध्ये कोरोनाला हरवण्यासाठी आईच्या दूधाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


पाहा व्हिडीओ : बाळाला कुशीत घेण्यासाठी आई आतुर, आईची पहिल्यांदा डोळे उघडलेल्या लेकीशी व्हिडीओ कॉलद्वारे भेट



आईच्या दूधामुळे बाळाची कोरोनावर मात


सहा महिन्यांच्या बाळाला आईचे दूध देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे स्तनपान करताना आई काळजी घेत होती. याचवेळी बाळावर उपचार देखील सुरू होते. सुरूवातीच्या दोन ते 4 दिवसांमध्ये बाळाला ताप येणे किंवा इतर त्रास जाणवला. पण, त्यानंतर मात्र बाळाच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली. औषध उपचारादरम्यान आईच्या दूधाने बाळाला कोरोनाच्या लढाईत खरी ताकद दिली, असं मत जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि बाळावर उपचार करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. दिलीप मोरे यांनी व्यक्त केले आहे. कारण उपचार सुरू असताना देखील बाळाला स्तनपान सुरूच होते. त्याचा देखील सकारात्मक परिणाम दिसून आल्याचं डॉ. मोरे यांनी सांगितले.


बाळाला केव्हा मिळणार डिस्जार्ज?


बाळाच्या प्रकृतीत सध्या कमालीची सुधारणा होत आहे. पुढील 4 ते 6 दिवसांमध्ये बाळाचे आणखी रिपोर्ट करण्यात येतील. त्यानंतर बाळाला सोडण्यात येईल अशी माहिती जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. सध्या रत्नागिरीतील सर्वच रूग्णांची प्रकृतीत उत्तम असून त्यांचे रिपोर्ट देखील निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, 3 मेपर्यंत नागरिकांनी असेच सहकार्य करावे असं आवाहन रत्नागिरीचे आमदार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.


संबंधित बातम्या : 


दिलासादायक... राज्यातील कोरोना चाचण्यांपैकी जवळपास 94 टक्के निगेटिव्ह


कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय


सॅनिटायझिंग टनेल मानवी शरीराला नुकसानकारक! तज्ञांचा दावा