मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास सर्वच देश या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचा हा उद्रेक रोखण्यासाठी सर्वच देशांना एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल तेड्रोस अढॅनोम घेब्रेयेसस यांनी सांगितलं. सोमवारी जिनिव्हा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


कोरोना व्हायरसची साथ अतिशय वेगाने पसरत आहे. आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक लोक या साथीच्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहेत. जगभरात जवळपास 15 हजारांहून जास्त लोक यामध्ये मरण पावले आहेत. आता या रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आक्रमक आणि योजनाबद्धपणे काम करण्याची गरज आहे, असं तेड्रोस अढॅनोम घेब्रेयेसस यांनी सांगितलं.


कोरोना व्हायरस किती झपाट्याने पसरत आहे सांगताना त्यांनी माहिती दिली की, कोरोना बाधित रुग्णांचा एक लाखाचा टप्पा 67 दिवसांमध्ये पार झाला होता. त्यानंतर पुढील 11 दिवसात आणखी एक लाख लोकांना या रोगाची लागण झाली आणि त्यानंतर अवघ्या चार दिवसात आणखी एक लाख लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाली. म्हणजे हा वेग असाच कायम राहिल्यास किती मोठ्या प्रमाण लोकांना या रोगाची लागण होईल हे त्यांना सांगायचं होतं.


जगातील सर्व विकसित आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ देशांना एकत्र येऊन या कठीण परिस्थितीत काम करण्याची आवश्यकता आहे. तसेच जी-20 देशांनी एकीने या संकटाचा सामना करायला हवा. जी- 20 देशांची दृढ एकता आपल्याला पुढे जाण्यास आणि या महामारीच्या विरोधात लढायला मदत करू शकते, असं यांनी म्हटलं.





गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 42 हजार नवे रुग्ण


जगभराताल आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास साधारण 3 लाख 78 हजार लोकांना कोरोना लागण झाली आहे. तर 16 हजर 502 जणांना या जीवघेण्या व्हायरसने बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 42 हजार नवे रुग्ण आढळले आहेत, तर 1861 जणांचा मृत्यू झाला आहे. इटली कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये सर्वाधिक 6,077 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात इटलीत 601 जणांना आपला जीव गमावला आहे.


संबंधित बातम्या :

coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी

Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय?

Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य?

Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात