कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपलं गाव सोडून विविध शहरांमध्ये काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आपआपल्या गावाला परतली आहेत. मात्र या लोकांमुळे गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, तसेच गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेहमीच आदर्श असणाऱ्या ऐतिहासिक माणगावातील ग्रामपंचायतीने एक दिवस आड संपूर्ण गावांमध्ये रात्री औषध फवारणीचा उपक्रम सुरु केलेला आहे. ही गोष्ट छोटी आहे...मात्र तितकीच डोंगराएवढी मोठी पण आहे.
माणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य राजू मगदूम, गावच्या महिला सरपंच ज्योती कांबळे यांच्यासह अन्य चार सदस्यांनी एकदिवस आड संपूर्ण गावांमध्ये येणारे रस्ते, गल्ल्या आणि गावाला लागून जाणारे काही मार्ग या सर्वांवर विविध औषधांची फवारणी करत आहेत. ही औषध फवारणी चालू आहे, ती कोरोनासोबतच इतर कोणतीही रोगराई गावात फिरकू नये या काळजी पोटी. माणगाव या गावातील अनेक तरुण नोकरी निमित्ताने तसेच काही शिक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर पसरलेले आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बाहेर असणारे सर्व नागरिक आता आपल्या गावाला येऊ लागलेले आहेत. या नागरिकांमधून कोरोनाची लागण झालेले नागरिकही गावात प्रवेश करु शकतात आणि त्यांच्यामुळे गावातील इतर नागरिकांना त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे स्मार्ट माणगाव ग्रामपंचायतीने एक विशेष पथक निर्माण केलेला आहे. या पथकातून बाहेरुन येणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. तसंच संपूर्ण गावभर विविध औषधांची फवारणी केली जात आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने हायपोक्लोराईड सोडियम 250 मिली, क्लोरो 50 मिली, डेटॉल 2 लिटर, सॅनिटायझर 200 मिली, 250 लिटर पाणी असे मिश्रण करुन याची फवारणी एक दिवस आड रात्री उशिरा संपूर्ण गाव परिसरात केली जाते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि त्यांना लागणारे साहित्य हे खेड्यापाड्यापर्यंत वेळेत पोहोचेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये आणि आपण आहे त्या स्थितीत व्यवस्थित राहावं यासाठी या गावाने हा प्रयत्न सुरु केलेला आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र ती वेळ माणगावमधल्या ग्रामस्थांनी येऊ न देताच यापूर्वीच स्वतः त्यांनी गावात स्वयंघोषित संचारबंदी लागू करुन घेतलेली आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल याची जाण गावकऱ्यांना असल्यामुळे सध्या गावात शुकशुकाट पसरलेला आहे.
संपूर्ण गावातील ग्रामस्थांना यापूर्वीच एकत्र बोलावून कोरोना विषाणू संदर्भात माहिती देत याची गंभीरता ग्रामपंचायतीने समजावून सांगितलेली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ही ग्रामपंचायत, सरपंच जे सांगतील त्या पद्धतीनेच गावातील लोक त्यांना सहकार्य करीत आहेत. या विषाणूची गंभीरता लक्षात घेऊन माणगाव ग्रामपंचायतीने स्वतःच्या गावाची सुरक्षा करण्यासाठी या हालचाली सुरु केलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासन, राज्य शासन यांच्याकडून ज्यावेळी मदत येईल त्यावेळी येईल येईल. पण आपल्या गावात अशा पद्धतीचा एखादा रुग्ण सापडू नये किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या गावालाही त्याची किंमत मोजावी लागू नये, यासाठी या गावातील ग्रामपंचायतीने हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे, असंच आपल्याला म्हणावे लागेल. माणगावसारखा आदर्श इतर गावांनीही घ्यायला काहीच हरकत नाही. ही गोष्ट छोटी आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीत ती डोंगरा एवढी मोठी आहे असंच आपल्याला म्हणावा लागेल.
प्रतिक्रिया :
ग्रामपंचायत सदस्य राजू मगदूम सांगतात की, माणगाव हे ऐतिहासिक गाव आहे. त्यामुळे इथले ग्रामस्थ नेहमी सकारात्मक भूमिका ठेवत असतात. आपल्या जिल्ह्यावर, राज्यावर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यातून सर्व सुखरुप बाहेर पडावेत असे प्रयत्नही करत असतात. सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचत होत्या. गावात यासंदर्भात चर्चाही सुरू झाली होती. यावेळी आम्ही ग्रामसभा घेऊन या व्हायरस संदर्भात खुली चर्चा केली. ग्रामस्थांकडून अनेक सूचनाही मागवल्या आणि त्यानंतरच जनजागृती मोहीम, आरोग्य तपासणी मोहीम आणि औषध फवारणीची मोहीम सुरु केली. गावातील बारीक-सारीक गोष्टीना ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देत आहेत.
कोल्हापूर जिल्हा स्मार्ट व्हिलेज माणगांवचे माजी सरपंच अनिल पाटील सांगतात की, महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या खेड्यांमध्ये आरोग्य यंत्रणा तत्काळ पोहोचत नाही. त्यामुळे शहराबरोबरच खेड्यांमध्ये ही नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असा त्रास गावकऱ्यांना होऊ नये म्हणून 'आम्ही आमचे रक्षक' असं म्हणत ही फवारणी आणि जनजागृती सुरु केलेली आहे. याला ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी, दिवसाआड औषध फवारणी; कोल्हापुरातील माणगावाचा स्तुत्य उपक्रम
रणजित माजगांवकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
24 Mar 2020 01:01 PM (IST)
कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीने एक विशेष पथक निर्माण केलेला आहे. या पथकातून बाहेरुन येणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. तसंच संपूर्ण गावभर विविध औषधांची फवारणी केली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -