सोलापूर : जमावबंदीच्या आदेशाचे योग्य पद्धतीने पालन केल्याने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे काल दिवसभरात सोलापुरातल्या रस्त्यांवर दिसणारी गर्दी काही प्रमाणात ओसरली. सोलापुरातल्या प्रमुख वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर लोकांची गर्दी कमी दिसत आहे. मात्र छोट्या गल्ली बोळामध्ये अद्यापही लोकांचा मुक्तसंचार सुरुच आहे. कोणते ना कोणते कारण सांगत हे लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, "ही संचारबंदी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीची नाही. स्वत:सह समाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये." मात्र तरी देखील प्रत्येक जण आपले घराबाहेर पडणे कसे अत्यावश्यक आहे हे सांगत घराबाहेर पडताना दिसत आहे.


संचारबंदी लागू झाल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या आदेशात एकाच ठिकाणी बसून भाजीपाला विकण्यास मनाई केली आहे. मात्र सोलापुरातल्या अनेक भाजी मंडईत लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सोलापुरातील घोंगडे वस्ती भाजी मंडई, मार्केट यार्ड परिसरातही भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी कोणतीच खबरदारी नागरिकांकडून घेतली जात नाहीत. मास्क, रुमाल, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर अशा कोणत्याच खबरदारी नागरिक घेताना दिसत नाही. त्यामुळे सोलापुरकरांना गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.



सोलापुरात एकाच दिवशी 1162 जणांवर कारवाई


कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वांनी घरीच राहण्याच्या सूचना सर्वत्र दिल्या जात आहेत. मात्र लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात सोलापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. सोमवारी (24 मार्च) जमावबंदी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला. सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 1162 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी 1101 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे. तर 61 जणांविरोधात भादंवि कलम 188 नुसार कारवाई केली आहे.


सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलिसात 165, सदर बाजार 122, विजापूर नाका 274, सलगर वस्ती 43, एमआयडीसी 129, जोडभावी पोलिसात 165 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरात 227 तर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत 103 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शहरात टवाळकी करत फिरणाऱ्या 31 आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.