मुंबई : देशातील कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. 'देशात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या संकटकाळात शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सुसंवाद साधत आहेत. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशात 3 मेपर्यंत वाढवण्यात आलेला लॉकडाऊन पाळण्यासाठी संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे.' असं शरद पवार म्हणाले.
'देशावर कोरोनाचं संकट आहे. देशातील वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा चिंताजनक आहे. त्यामुळे वयोवृद्ध लोकांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, असा सल्लाही शरद पवारांनी जनतेला दिला आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग बंद आहेत. अशातच कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येणार आहे. एवढचं नाहीतर शेतकऱ्यांवरही शेतीचा माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे परिणामही एक ते दोन वर्षांपर्यंत जाणवणार आहेत.'
राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, 'स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे. त्यांच्या प्रवासाची सोय करु शकत नाही. मात्र त्यांच्या जेवणाची खबरदारी सरकार आणि सेवाभावी संस्थांनी घेतली आहे. ज्यामुळे त्यांची उपासमार होणार नाही.'
कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांबाबतही जागरूक करण्याचं कामंही शरद पवारांनी केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'कोरोनाचं संकट राज्यावर आलं असतानाच त्यापाठोपाठ दुसरं संकटही राज्यावर येणार आहे. काही प्रमाणात ते आलंही आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम सध्या दिसून येत आहेत. कोरोना संकटाचा अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. याबाबत आतापासूनच काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाशी संयमानं मुकाबला करणं आवश्यक आहे.' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.