मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. संचारबंदीच्या काळात कुणीही अनावश्यक प्रवास करू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई, पुण्यासारख्या शहरातून गावाकडं जाणासाठी लोकं जीवघेण्या मार्गांचा अवलंब करत आहेत. यात मजुरांचं प्रमाण जास्त आहे. आता रोजगार नाही आणि त्यातच कोरोनाची लागण होण्याच्या भीतीमुळे इतर राज्यातून मुंबईत काम करण्यास आलेल्या कामगारांनी विविध मार्गांनी शहरं सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मुलुंडमध्ये एका टेम्पोतून 64 जणांना उतरवलं

काल रात्री मुलुंड येथील आनंद नगर टोल नाक्यावर एका टेम्पोमधून थेट उत्तर प्रदेश गाठण्याचा प्रयत्न 64 जणांनी केला होता. मात्र नवघर पोलिसांनी हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता ही बाब समोर आली आहे. हे सर्व कामगार असून मुंबईच्या मुंबादेवी परिसरात राहतात. तिथे हातगाडी चालवणे, तसेच इतर मिळेल ते काम करीत होते. मात्र आता हातालाच काम नसल्याने मुंबईत नक्की कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणून त्यांनी अखेर टेम्पो चालक फारुख शेख यांच्या टेम्पोमधून उत्तर प्रदेश गाठण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास कमीत कमी 3 दिवस चालणार होता. मात्र कमी जागेत कसेबसे कोंबून बसून या 64 जणांनी प्रवास सुरु केला खरा परंतु मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी टेम्पो चालक, मालक तसेच या लोकांना काम देणारे व्यक्ती अशा चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून या सर्वांना पुन्हा रात्री कुंभारवाडा येथे सोडण्यात आले.

अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


40 युवकांना ट्रकमध्ये कोंबून नेणाऱ्यावर कारवाई

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी काळात जिल्हा बंदी आणि राज्य सीमाबंदी असताना पोलीस चौकी पार करून पोलिसाची नजर चूकवून हैद्राबादवरून वाशीम मार्गे राजस्थानला जाणाऱ्या एका ट्रकला वाशीम शहर पोलिसांनी पकडले. आज सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. या ट्रकमध्ये एकूण 40 युवक होते. हे युवक रोजगारासाठी हैद्राबादला गेले होते. ते राजस्थानला निघाले होते.

सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाल्या रस्त्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची सोय करा

नागपुरात कडक बंदोबस्त
दुधाच्या टँकरमधून प्रवाशांची ने आन करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आता अशा दुधाच्या टँकरची देखील पोलिसांतर्फे पूर्ण तपासणी करण्यात येत आहे. नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या अशाच एका दुधाच्या टँकरची पोलिसांनी पूर्ण तपासणी केली. टँकरच्या झाकणाला सील लागल्याची व ड्रायव्हर जवळील कागदपत्रांची पूर्ण तपासणी करूनच हा टँकर पुढे सोडण्यात आला. पोलिसांकडून सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.


शेकडो ट्रक अडकले
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने राज्याच्या तसेच जिल्हाअंतर्गत सीमा बंद केल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर तळकोकणातील बांदा येथे सीमेवर शेकडो ट्रक अडकून पडले आहेत. या ट्रकचालकांना उपासमारीस सामोरं जावं लागत आहे. याची दखल घेत सामजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली.

राज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

पायी घरी जाणाऱ्या मजुरांना टेम्पोने उडवलं
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला आहे. यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचार बंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची मात्र ओळख पटली नाही. ओळख पेटलेल्या पैकी कल्पेश जोशी (32) तर दुसरा मयांक भट (34) अशी आहेत.


देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने गुजरात व राजस्थान येथील शेकडोच्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी निघाले आहेत. पण गुजरात शासनाने आपल्या सीमा बंद केल्याने हे सर्व नागरिक सीमा भागात अडकून पडले आहेत. यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. मुंबई, पुणेसह पालघर जिल्ह्यातील व राज्यातील इतर भागात असलेल्या गुजरात व राजस्थानमधील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाणं पसंत केले आहे. रेल्वे तसंच इतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडोंच्या संख्येने हे नागरिक गुजरातच्या दिशेने चालत निघाले होते. हे सर्व लोक महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील आच्छाड जवळ पोहोचले असून गुजरात सरकारने आपली सीमा बंद केल्याने शेकडोंच्या संख्येने हे नागरिक खोळंबून पडले आहेत.