मुंबई : देशभरात लॉकडाउन घोषणा केल्यानंतर गुजरात आणि राजस्थान येथील शेकडोच्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी निघाले आहेत. पण गुजरात शासनाने आपल्या सीमा बंद केल्याने हे सर्व नागरिक सीमा भागात अडकून पडले आहेत. यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.


कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे मुंबई, पुणेसह पालघर जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागात असलेल्या गुजरात व राजस्थानमधील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाणं पसंत केले आहे. रेल्वे तसंच इतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडोंच्या संख्येने हे नागरिक गुजरातच्या दिशेने चालत निघाले होते.

ही सर्व मंडळी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील आच्छाड जवळ पोहोचली असून गुजरात सरकारने आपली सीमा बंद केल्याने शेकडोंच्या संख्येने हे नागरिक खोळंबून पडले आहेत. एकीकडे राज्यामध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी असताना ही सर्व मंडळी एकत्रितपणे रस्त्यावर बसून राहिली असून त्यामधून तोडगा काढण्यासाठी पालघरचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग व अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

या नागरिकांनी आपापल्या ठिकाणी परत जावे व त्यासाठी वाहने पुरवण्याची तयारी राज्य शासनाने दर्शवली असून तशा प्रकारच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. मात्र आपल्याला आपल्या मूळ गावी जाण्याचा या कामगारांचा अट्टाहास असल्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या खोळंबलेल्या शेकडो नागरिकांना जेवणाची सुविधा करण्यासाठी शासकीय व्यवस्था प्रयत्नशील आहे. मात्र या जमावाला पांगवणे हे शासनासमोरील आव्हान असणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी देखील अनाधिकृतपणे प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. . मात्र, काही जण ट्रक आणि टँकरमधून प्रवास करत आहे. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.

उपाशीपोटी प्रवास सुरु
लॉकडाऊन केल्यानंतर सद्यस्थितीला फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स बंद असल्याने वाटेत उपाशीपोटी त्यांना प्रवास करणे भाग पडले आहे. पोटामध्ये अन्न नाही, प्यायला पाणी नाही, डोक्यावर ऊन, पायात चप्पल नाही अशा परिस्थितीत घर गाठायचे कसे? हा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून काहीतरी मदत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या : 

अनाधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्थलांतरित कामगारांनी धरली गावची वाट, गुजरात ते पालघर तब्बल 35 ते 40 किमी पायी प्रवास

Coronavirus | चक्क कंटेनरमधून 300 जणांचा तेलंगणाहून राजस्थानला प्रवास